दासबोधातील एक वेगळा आणि सुंदर विषय! या समासाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अफझलखान वध ही पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी अफझलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी श्रीसमर्थ शिवथरघळ येथे होते. या समासातील पहिल्या १३ ओव्या या प्रसंगात सावधपणे कसे कार्य करायचे हे सांगितले असून नंतरच्या ओव्या अफझलखान वधानंतर शिष्याचे कौतुक म्हणून लिहिल्या आहेत.
शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले याचा अर्थ त्यांना समजत नव्हते असे बिलकुल नाही. याठिकाणी सद्गुरू आणि सतशिष्य यांचे नाते कसे असते हे दिसून येते. शेवटी ती गुरुमाऊली आहे, आपल्या बाळावर कधीच ओरखाडासुद्धा येऊन देणार नाही. महाराष्ट्रचे असे भाग्य की या पवित्र भूमीत एकाच वेळी तीन विभूती होऊन गेल्या -- श्रीसमर्थ, शिवाजी महाराज आणि संत तुकोबा.
हा समास म्हणजे राजकारण , राज्यकर्त्याने कसे असावे आणि वागावे, गुरुशिष्याचे नाते याचा उत्तम नमुना आहे. राजाने प्रत्येक प्रसंगी सावध असावे, पुढे काय होऊ शकते याचा अंदाज बांधता यायला हवा, मनुष्य जोडणे, त्याना पारखणे, शत्रूस कायमचे नेस्तनाबूत करणे, प्रसंगी वध करणे आणि सर्वात महत्वाचे राज्य करताना ईश्वराचे अधिष्ठान ठेवणे यासर्व गोष्टी हा समास शिकवतो. दासबोधात अनेक विषय श्रीसमर्थांनी हाताळले आहेत त्यातील हा एक विषय!
पहिल्या दोन ओवीत सावधपणा कसा असावा हे श्रीसमर्थ सांगतात. नुसते शरीर सुंदर, रुबाबदार असून चालत नाही तर राजाने प्रसंग ओळखून त्यानुसार पावले उचलावीत. त्यानुसार योजना आखावी. शत्रूची चाल ओळखणे, त्यानुसार रणनीती आखणे, शत्रूला बेसावध ठेवणे, शत्रूची ताकद ओळखणे, स्वतःच्या मर्यादा ओळखणे आणि त्यानुसार आखणी करणे, गुप्तता, योजना, वेळेचे महत्व, प्रसंगानुसार माणसांची निवड, आत्मविश्वास, धाडस या सर्व गोष्टी म्हणजे राजकारणातील विवेक. श्रीसमर्थांनी दासबोधात विवेक हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. विवेके विचारे राजकारणे। अंतर शृंगारिजे ।।
अंतर म्हणजे मन. मनास सजव, म्हणजे उत्तम राजकारणाने सजव. शरीर सुंदर असून चालत नाही तसेच माझ्याकडे अमूक अमुक शस्त्रे आहेत या गैरसमजात राहू नये. नुसती शस्त्रे असून चालत नाही तर शत्रूस ओळखता यायला हवे. तो दगाफटका करू शकतो हे राजास समजले पाहिजे आणि त्यानुसार योजना आखावी असे श्रीसमर्थ सुचवतात. अफजलखान किती क्रूर आहे, कपटी आहे, धर्माध आहे याचे वर्णन पुढील तीन ओव्यात आहे. त्यामुळे भेटीच्या वेळी चिलखत असावे असे सुचविले आहे. शस्त्रसज्य कसा रहा हे श्रीसमर्थ राजांना सांगत आहेत. याचा अर्थ असा नाही की राजांना हे समजत नव्हते, पण गुरुशिष्याचे नाते हे असे असते हे पुन्हा एकदा अधोरेखित करावेसे वाटते.
समयासारिखा समयो येना। ...
प्रत्येकवेळी शत्रू एकच चाल खेळल असे नसते. प्रत्येकवेळी प्रसंग वेगळा असतो तसेच एकच नियम सगळीकडे आणि प्रत्येकवेळी लागू पडत नाही. त्यामुळे नियमानुसारच चालण्याचा आग्रह धरू नये. महाभारत हे याचे उत्तम उदाहरण आहे. जर कृष्णनीती नसती तर पांडव हरलेच असते. परंतु ते धर्मयुद्ध होते, धर्म जीवंत राहणे हे आवश्यक होते आणि अधर्माचा नाश होणे गरजेचे होते. याठिकाणी अफझलखान धर्मच बुडवायला निघाला होता. राज्यावर चाल करून येताना अनेक देवळे फोडली होती, अत्यंत अत्याचार करत तो येत होता. मग प्रसंगी त्याचा वध करणे आवश्यकच होते म्हणून कोणी येकाचा शेवट।झाला पाहिजे ।। असे सुद्धा श्रीसमर्थ सांगतात. हेच श्रीसमर्थांचे वेगळेपण! स्वराज्य उभारणीसाठी शिवाजीमहाराजांना मदत कर अशीच श्री प्रभुरामचंद्रानी आज्ञा केली होती. यवनसत्तेमुळे अधर्म वाढला होता. अस्मानी सुलतानी महाराष्ट्रात होती. अशावेळी शिवाजी महाराज जन्माला आले. श्रीसमर्थ हे २३ वर्षांनी राजांपेक्षा मोठे आहेत. मग अशा संकटात शत्रूचा वध हे अत्यावश्यकच असते, त्याची बडदास्त ठेवणे नाही तर त्याचा नाश हेच महत्वाचे! हेच श्रीसमर्थ सुचवतात. धर्म जिवंत ठेवणे गरजेचे, शत्रू नाही!
अफजलखान भेटीच्या वेळी काय तयारी केली हे सर्वाना माहीत आहेच. पण तो विजपुरहून निघाला त्यावेळपासून श्रीसमर्थांचे महंत गुप्तहेराचे कार्य करत होते व बातम्या काढत होते. त्याकाळी कोणत्याही साधूला दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी लागत नव्हती. याचाच फायदा श्रीसमर्थ आणि राजांनी घेतला. विजापूरचा सरदार निघाला आहे असे सांकेतिक भाषेत सांगणारे पत्र महाराजांपर्यंत श्रीसमर्थानी पोहोचवले. पण याचा अर्थ असा सुद्धा नाही की राजांची गुप्तहेर संघटना सक्षम नव्हती. या ठिकाणी श्रीसमर्थ आणि शिवाजी महाराज यांचा ताळमेळ दिसतो, श्रीसमर्थांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कसे सहाय्य केले हे समजते.
अफझलखान वधाच्या प्रसंगात कशी आखणी केली गेली, कसे लोक गोळा केले, अफझलखान कसा वागला, वधानंतर कशी शत्रूची धूळधाण उडवली याचे सुरेख वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी राजशिवछत्रपती या पुस्तकात केले आहे.
बरे ईश्वर आहे साभिमानी। विशेष तुळजाभोवानी । ... तसेच सकळकर्ता ईश्वरू ।
या दोन्ही ओव्या हेच सांगतात की ईश्वराचे अधिष्ठान अतिशय महत्वाचे असते. त्यांचा आशिर्वाद हा महत्वाचा! तो घेताना नम्रपणा हवा. अभिमान आणि दुराभिमान हा फरक राज्यकर्त्याला समजला पाहिजे. अभिमान हा ज्यावेळी अति अभिमानात परिवर्तित होतो त्यावेळी तो अहंकार होतो. अहंकारामुळे नाशच होतो. मी हिंदू आहे याचा अभिमान असावा व अहंकार नसावा. तो झाल्यास दुसऱ्या धर्मविषयी द्वेष निर्माण होतो. तो घातक आहे. मी स्वरूप संप्रदायाचा आहे म्हणजे मी श्रीसमर्थांचा आहे याचा अभिमान असावा पण दुराभिमान नसावा. अन्यथा दुसऱ्या संप्रदायाचा राग यायला लागतो आणि हेतू बाजूस रहातो. त्यामुळे अभिमान आणि अहंकार यामधील पुसटसा फरक ओळखून वर्तन करायला लागते. ते राजांनी ओळखले आणि खानाने नाही!
मग ईश्वराचे आशिर्वाद असलेली माणसे कशी असतात याचे वर्णन शेवटच्या आठ ओव्यात आहे आणि शिवाजीमहाराज तसे होते. २० व्या ओवीत ज्याज्या वेळी अधर्म डोके वर काढतो त्यावेळी एक महापुरुष जन्म घेतो व धर्मस्थापना करतो हे सांगितले आहे. ही ओवी वाचताना "यदा यदा ही धर्मस्य...." या गीतेमधील ओवीची आठवण येते.
असा हा सुंदर समास, पुनःपुन्हा वाचून प्रेरणा घ्यावी असा!