आपण सर्व संसारी माणसे! आधी प्रपंच करावा नेटका। हे पाहिले. म्हणजे प्रपंच उत्तम करण्यासाठी चांगले काय, सावधानता कशी बाळगायची,घरात कसे वागायचे,दुसऱ्याशी कसे बोलायचे अशा अनेक गोष्टी या समासात श्रीसमर्थ सांगतात.

हा दशक मूर्ख लक्षणांचा आहे. मूर्ख म्हणजे स्वतःचे भले कसे करून घ्यायचे हे समजत नाही, ज्ञान असते व त्याचा उपयोग करत नाही असा! ( आपण समजतो तसा " मूर्ख " नाही) या समासात श्रीसमर्थ ही लक्षणे नकारात्मक रीतीने सांगतात. नकारात्मक सांगितले की लवकर पटते. ही लक्षणे सावधपणे ऐकायची, त्यावर विचार करावा व आपल्या स्वभावात बदल करावा हे श्रीसमर्थाना अपेक्षित आहे. ही लक्षणे ऐकल्यावर आपल्यात बदल होतो.

सुरवात करताना " वाट पुसल्याविण जाऊ नये।" असे श्रीसमर्थ सांगतात. ( वाट न विचारता जातो तो .... मूर्ख) आपल्याला कधी कधी अनोळखी ठिकाणी जाण्याची वेळ येते. त्यावेळी आपण नीट चौकशी न करता जातो त्यामुळे वाट चुकते,फसवले जातो,प्रवास त्रासाचा होतो. त्यामुळे जाण्याआधी कसे जायचे,रिक्षा /बस जाते का? रिक्षावाले किती पैसे घेतात-- मीटरने की सीट प्रमाणे, स्टेशन पासून किती दूर आहे,जवळची खूण काय अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्यात.

पडिली वस्तू घेऊ नये।
हल्ली अनोळखी वस्तुस हात लावू नका असे स्टेशनवर,बस स्टँडवर ऐकू येते. कारण सर्वाना माहीत आहेच.
चोरास ओळखी पुसू नये।
अनोळखी माणसाशी बोलताना सावधपणा बाळगायला हवा. उगाच स्वतःबद्धल माहिती देत बसू नये, त्याचा गैरफायदा घेतला जातो. प्रवास करताना सावध असायलाच हवे.
पाप द्रव्य जोडू नये।
पैसा प्रामाणिकपणे मिळवावा, पैसे खाऊ नयेत,गैरमार्गाने पैसा आणू नये तो लाभत नाही.
तोंडाळसी भांडो नये।वाचाळासी तंडो नये। अति क्रोध करू नये।
या ओव्या आपला राग आवरावा, भांडू नये,कोणाचे मन दुखवू नये हे सांगतात.

आपले वोझे घालू नये।कोणी येकासी। म्हणजे आपले काम आपणच करावे, दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. स्वतः प्रयत्न करावा,कष्ट करावेत.
धूम्रपान घेऊ नये। उन्मत्त द्रव्य सेऊ नये। -- कोणत्याही प्रकारचे व्यसन नसावे. कोणताही प्रसंग असो दारू,सिगारेट पासून शंभर हात दूर राहावे.
मागे उणे बोलो नये।कोणी येकाचे।। पाठ वळली की आपण त्याची निंदा सुरू करतो, नावे ठेवतो. असे करू नये.
हरि भक्तीस लाजो नये। स्नानसंध्या सांडू नये।
कुळाचार खंडू नये।
हरि कथा सांडू नये।निरूपण तोडू नये।
परमर्थास मोडू नये।
देवाचा नवस बुडवू नये।
अशा गोष्टी सांगून भगवंताचे स्मरण सतत ठेवावे असे सांगतात. कुळधर्म- कुळाचार सोडू नयेत, ते करावेत, त्यासाठी वेळ नाही असे म्हणू नये. देवाबद्धल कृतज्ञा असावे.

मळीण वस्त्र नसो नये।
आपले कपडे स्वच्छ असावेत,नीटनेटके असावेत तसेच अंगभर असावेत.

अशा अनेक प्रकारे उपदेश श्रीसमर्थ करतात. हा उपदेश ऐहिक व पारमार्थिक दोन्ही स्वरूपाचा आहे. ऐहिक म्हणजे रोजच्या जगण्याविषयी! ते जर नीट असेल,योग्य असेल तरच पारमार्थिक प्रगती होईल. आधी प्रपंच करावा नेटका।मग घ्यावे परमार्थ विवेका। हे आपण पाहिले आहेच. रोजचे जीवन व परमार्थ हातात हात घालून चालतात. ततामुळे या समासाचा नीट अभ्यास करून त्यानुसार आचरण केले तर आयुष्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।