ब्रह्म सकळांसी विसावा।
विश्रांतीठाव।।
असे ओवी १९ मध्ये श्रीसमर्थ सांगतात. दशक १ समास १ या मधील ओवी आठवते --
..........
मनास होय विश्रांती।
समाधान।। १-१-३७
या ओवीशी संबंध जोडू या. दासबोधाच्या सुरवातीला सांगतात सांगतात तसेच या ग्रंथाचा शेवट करताना सुद्धा सांगतात. मग ही विश्रांती म्हणजे काय? पाहू या --- ही विश्रांती कोणाला मिळते तर मनाला. मन काय करत असते? मन सतत संकल्प विकल्प करत असते. असे मन का करते? याचे कारण मन सतत सुख, आनंद शोधायचा प्रयत्न करते. आयुष्यातील सर्व निर्णय मन घेते,सर्व काही मन करते. पण मन हे मायेच्या अमलाखाली असल्यामुळे सुख हे वस्तूत शोधले जाते, दृश्य जगात शोधले जाते. परंतु हे जग कायमस्वरूपी नसल्यामुळे, तसेच सतत बदलत असल्यामुळे सुख, समाधान कायमस्वरूपी राहूच शकत नाही. दृश्य जगत हे अपूर्ण आहे. त्यामुळे मिळणारे समाधान हे क्षणिक असते. आपण या हिंदोळ्यावर झुलत रहातो. निसर्गतःच आपला ओढा हा पूर्णत्वाकडे जाण्याचा असतो, ते आपण शोधत असतो. हे पूर्णत्व फक्त आणि फक्त ब्रह्मातच प्राप्त होते. फक्त ब्रह्मच पूर्ण आहे. ओम पूर्णमीदम... हा श्लोक माहीत असेलच. एकदा का ब्रह्म समजले,त्याची अनुभूती आली की ही धडपड थांबते. कारण आपली पूर्णत्वाकडे जाण्याची धडपड ब्रह्मप्राप्ती नंतर थांबते. ब्रह्मप्राप्ती म्हणजेच स्वस्वरूप ओळखणे. थेंबुटा सागरी बुडाला। थेंब सागरात पडला की सागरच होऊन जातो, वेगळे अस्तित्व संपते. त्याप्रमाणे येथे द्वैत संपते. वेगळेपण संपते. पूर्णत्व प्राप्त होते. त्यामुळे समाधान प्राप्त होते, हवे नकोपण संपते. ब्रह्मस्वरूप हे आनंदी आहे, तेथे पूर्ण समाधान आहे. मनोव्यापार थांबतो. हा थांबल्यामुळे मनास विश्रांती मिळते. कारण मनच ब्रह्म होऊन गेलेले असते. ही अनुभूती कोणीही घेऊ शकते.
ब्रह्मस्वरूप समजणे हेच खरे ज्ञान होय. ही ज्ञानदृष्टी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत समाधान नाही (ओवी २१)
ओवी २२ मध्ये पिंडब्रह्माण्ड निरास अशी शब्दरचना आली आहे. याचा अर्थ पाहू. पिंड म्हणजे आपले शरीर आणि ब्रह्मान्ड म्हणजे असपन सोडून दिसणारे सर्व जग. निरास म्हणजे नाहीसे करणे. ज्यावेळी स्वस्वरूप ओळखायचे असते त्यावेळी " नेती नेती " करावे लागते. एक एक संकल्पना दूर कराव्या लागतात. पुन्हा दिवा आणि पडदा याचे उदाहरण घ्या. एक एक पडदा दूर सारल्या शिवाय दिवा दिसणार नाही. त्यानुसार दृश्य जगताचे खरे स्वरूप जाणून त्या दृश्यापासून दूर व्हायचे, अलिप्त व्हायचे. याचाच अर्थ निरास करणे. हा निरास करत करत देहापाशी यायचे. मग आपला आपणच विचार करायचा -- हा देह कायमस्वरूपी आहे का? हा देह तर सतत बदलत असतो,त्यात बदल घडत असतात. म्हणजे ते माझे स्वरूप नाही, हा देह म्हणजे मी नाही कारण तो नश्वर आहे. मग काय रहाणार? फक्त आत्मा. कारण आज ना उद्या सूक्ष्म देह हा सुद्धा ब्रह्मात विलीन होणार आहे. आपल्या वासना आणि मन तसेच संचिताचे गाठोडे म्हणजे सूक्ष्म देह. हा मृत्यूसमयी देह सोडतो कारण आता या देहाचा काहीच उपयोग नाही हे त्याला समजते त्यावेळीच जीव बाहेर पडतो. हा जीव आत्म्याच्या मदतीने कार्य करतो, म्हणजे आत्मा हा इंधनाचे कार्य करतो ज्यानुसार वीज दिसत नाही पण तिचे कार्य दिसते अगदी तसेच. मग मी कोण हे शोधत शोधत आत्म्यापर्यंत जाऊन पोहोचलो की माझा प्रवास थांबतो. यालाच पिंडाचा निरास म्हणतात, हीच जाणीव दृश्य जगताविषयी होते म्हणजे ब्रह्मान्ड निरास. हा निरास झाला की काहीच उरत नाही, उरते फक्त परब्रह्म. पिंड आणि ब्रह्मान्ड फक्त भास आहे.
अशा ब्रह्माचे वर्णन करता येत नाही, ती फक्त अनुभूती आहे,जाणीव आहे,अनुभव आहे. त्यासाठी विवेक हवा. मग हा विवेक जागा होण्यासाठी अध्यात्म श्रवण करून त्यावर मनन करावे आणि स्वतः अनुभव घ्यावा.