जगामध्ये ज्ञानी व अज्ञानी असे दोन गट असतात, यात अज्ञानीच जास्त संख्येमध्ये असतात, ज्ञानी दुर्मिळ असतात. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी, स्वस्वरूप जाणणारे. अज्ञानी म्हणजे देह म्हणजे मी असे मानणारे. यांची देहबुद्धी प्रबळ असते. आत्मज्ञान नसते त्यामुळे जन्ममृत्युच्या फेऱ्यात माणूस अडकतो. श्रीसमर्थ हे कायम समाजाभिमुख आहेत.
जे जे आपणासी ठावे।
ते बहुतांस सांगावे।
शहाणे करुनी सोडावे।
बहुत जन।।
ही श्रीसमर्थांची शिकवण! यानुसार आपल्याला झालेले आत्मज्ञान लोकांपर्यंत पोहोचवून त्यांनासुद्धा आत्मज्ञानी करावे करावी असे श्रीसमर्थ सांगतात. असे जो समाजात कार्य करतो तो श्री समर्थांचा उत्तमपुरुष होय. लोकांना आत्मज्ञानाकडे वाकवण्यासाठी ज्ञानी पुरुषांच्या अंगी कोणते गुण असावेत, तसेच लोकांना आत्मज्ञानाकडे वळविण्यासाठी ज्ञानी पुरुषाच्या अंगी कोणते गुण असावेत हे श्रीसमर्थ या समासातून सांगतात.
समासाची सुरवात "आपण यथेष्ट जेवणे। .... " या ओवीपासून होते. पहिली ओवी सामाजिक भान शिकवते. आपण पोटभर जेवल्यावर उरलेले अन्न काय करतो? समारंभात जेवण असते, बुफे असते. आपण काय करतो?एकावेळी केवढे ताट भरून घेतो? सर्व यात खाऊन संपवतो का? पाण्याच्या ग्लास मध्ये स्ट्रॉ खुपसतो व थोडे पाणी पिऊन उरलेले पाणी ग्लासासकट डब्यात टाकून देतो. श्रीसमर्थ " हा धर्म नव्हे" असे ठणकावतात. यावर विचार व्हावा.
अशा प्रकारे ज्ञानाने तृप्त व्हावे (ज्यावेळी ज्ञान शब्द येईल त्याचा अर्थ आत्मज्ञान असा घ्यावा) व ते दुसऱ्या पर्यंत पोहोचवावें. कारण समाज भवसागरात बुडत आहे. भवसागर म्हणजे जन्म आणि मृत्यू यामधील जीवन. जीवन जगताना सुखाच्या कल्पना या सर्व आपल्या शरीराभोवती फिरत असतात. उत्तम खाणे,उत्तम कपडे, उत्तम घर, उत्तम वाहन, भरपूर ऐश,फिरणे, जगणे म्हणजे फक्त मजा मस्ती. अशी धारणा घेऊन प्रत्येकजण जगत असतो. आज माझ्याकडे पैसा आला की मी सुखी होईन असे वाटते, कारण पैशाने सर्वकाही होते अशी चुकीची समजूत बाळगून आपण जगत असतो. आपले सुख वस्तूत असल्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी समाधान कधीच मिळत नाही. ही बाब आपल्याला समजत नाही. परिणामी जीवन मरणाच्या फेऱ्यात अडकतो. याला म्हणतात भवसागरात गटांगळ्या खाणे. आपण बुडत आहोत. अशा वेळी उत्तम पुरुषाचे कार्य सुरू होते. तो समाजाला उन्नत करण्याचे कार्य करतो. श्रीसमर्थ हेच सांगतात. उत्तम पुरुषाने समाजात जाऊन काम करावे आणि भवसागरात बुडत असलेल्या समाजाला वाचवावे --
"तरतेन बुडो नेदावे।बुडतयासी।।"
समाजात कार्य करताना कसे वागावे याचे मार्गदर्शन तिसऱ्या ओवीपासून सुरू होते. स्नान-संध्या,पूजाअर्चा न चुकता करावी. परोपकार करावेत, अडलेल्या,गांजलेले असतील त्याना मदत करावी. आपल्याला समाजात जर कार्य करायचे असेल तर कसे वर्तन करावे याचे उत्तम मार्गदर्शन श्रीसमर्थ येथे करतात. मुख्य म्हणजे कोणाचे मन कधी दुखवू नये,कोणाशी कठोर बोलू नये,वागू नये. लोकांशी गोड बोलावे, जर कोणी चुकत असेल तर चुकांकडे दुर्लक्ष करावे, अन्याय क्षमावे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन ते हलके करण्याचा प्रयत्न करावा. असे करताना लोकांचे निरीक्षण सुद्धा करावे. उत्तम,चांगले दुसऱ्याला द्यावे. रागास कधी येऊ नये. प्रयत्न खूप करावा व तो योग्य प्रकारे करावा. हे सामाजिक भान बाळगून स्वतःचा संसार उत्तम करावा.
हे सर्व का करायचे? याचे उत्तर ---
मरणाचे स्मरण असावे।.... ( ओवी १३ )
आपण आवचिते मरोन जावे।... ( ओवी ३३ )
जगताना कायम समाजाचा विचार करावा. मला ज्ञान झाले ते दुसऱ्यास व्हावे हीच भावना हवी. स्वस्वरूप ओळ्खल्यावरच खरे समाधान प्राप्त होते, ते दुसऱ्यास कसे मिळेल याचा विचार करतानाच माझ्या नंतर म्हणजे माझ्या मृत्यू नंतर सुद्धा हे कार्य कसे चालू राहील याचा विचार ज्ञानी माणसाने करावा. एवढी उदात्त भावना असावी, निःस्वार्थी जीवन जगावे. ( या ठिकाणी आपल्याला पाहावे. आज मी दासबोधाचा अभ्यास करत आहे, मला आनंद मिळत आहे मग हा मु दुसऱ्यास कसा देऊ शकेन हा विचार जागृत करावा. जास्तीतजास्त लोकांपर्यंत दासबोध पोहोचवावा)
ओवी १६ ते २७ या ओव्या फार मन लावून वाचाव्यात आणि आत्मपरीक्षण करावे. मी कसा बोलतो?किती रागाने बोलून दुसऱ्यास दुखवतो, मग मला जर असे बोलले गेले तर किती मनाला लागते याचा विचार करावा. मला चिमटा काढला तर दुखते ना! मग मी दुसऱ्याला चिमटा का काढावा? ( दुखवावे ). असे बोलून,वागून मला काय मिळते याचा गंभीरपणे विचार करावा. दुसऱ्याला दुखावणे याला श्रीसमर्थ राक्षसी क्रिया म्हणतात. अपवित्र वैखरी म्हणतात. असे वागणे आपल्याला अधोगतिकडे नेते. मग मला काय हवे आहे?
ओवी ३४ - समाजात कार्य करताना कधीच, कोणाकडे काहीही मागून नये. काही मिळेल या उद्देशाने कार्य करू नये, माझे नाव होईल, प्रसिद्धी मिळेल यासाठी काम करू नये. पूर्ण निःस्वार्थी काम करावे. देणारा रघुनंदन आहे, देणारा " तो " आहे याचे भान ठेवावे.
सामाजिक कार्य करताना समाजाचा विचार आधी करावा हे श्रीसमर्थ वारंवार सांगतात. त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा. तो करताना लोकांच्या कलेने घ्यावे,वागावे तरच बोलण्याला किंमत येते. अशा प्रकारे लोकांना भक्तिमार्गाकडे हळूहळू घेऊन जावे, त्यांना मार्ग क दाखवावा. हे करताना अहंकार बाजूस ठेवावा तरच लोक आपली बोलण्याची, वागण्याची दखल घेतात ही जाणीव ठेवावी, भान ठेवावे. असे वागले तरच मोठे कार्य उभे राहते अन्यथा आपण एकटे पडतो.