खूप सुंदर समास!रोजच्या आयुष्यात कसे जगावे हे शिकवणारा! " दिसणे/रूप " याबद्धल , या संकल्पनावर भाष्य करणारा व डोळे उघडणारा असा समास! या समासाची सुरवातच एका सुंदर ओवीने होते ----
रूप लावण्य अभ्यासिता न ये।
सहज गुणासी न चले उपाये।
काही तरी धरावी सोये।
अगांतुक गुणाची ।। १ ।।

सहज म्हणजे जन्मबरोबर, जन्मतःच. आपलं दिसणे हे आपल्या हातात नाही, आपला रंग,रूप,उंची कोणतीही गोष्ट आपल्या हातात नाही. या गोष्टी असपल्याला जन्मबरोबर मिळतात. त्यात आपण बदल करू शकत नाही. मग आपण विचाराने सुंदर व्हावे,देखणे व्हावे. यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. जे जे चांगले आहे, आदर्शवत आहे अशा गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. तसे झाले तर आपले व्यक्तिमत्व हे सुंदर होते. ते कसे सुंदर होईल यावर विचार करावा. शारीरिक सौंदर्य हे क्षणिक असते पण मनाचे,विचाराचे,वागणुकीचे सौंदर्य हे कायमस्वरूपी असते.

हाच मुद्दा उलगडण्यासाठी श्रीसमर्थ ओवी २ ते ४ मध्ये छान समजावून सांगतात. ते प्रश्न विचारतात -- काळा माणूस गोरा होईल का?चेहऱ्यावरील व्रण जातात का? मुका बोलू शकतो का? आंधळा डोळस होईल का? बहिऱ्या माणसास ऐकू येईल का?पांगळ्यास पाय येतील का? असे साधे पण अर्थपूर्ण प्रश्न याठिकाणी विचारले आहेत. आणि हल्ली आपण काय करतो? विचार करा. आपण केस काळे करतो,गोरे होण्यासाठी वेगवेगळी क्रीम लावतो, स्किन ट्रीटमेंट घेतो, कारण मला सुंदर आणि तरुण दिसायचे आहे. पण वयानुसार शारीरिक बदल होणारच हे असपन स्वीकारत नाही आणि तेथेच घोटाळा होतो. आज जाहिरातींमधून अशा जाहिराती अधिक दाखवल्या जात आहेत आणि देहबुद्धी वाढवली जात आहे. आपण त्याच्या मागे धावत आहोत. बरोबर ना? मग याचा त्याग करायला हवा, आपण खोट्या गोष्टींच्या मागे न धावता स्वतःतील गुण वाढवावेत, कारण ते समाजाला उपयोगी पडणार आहेत. मी या समाजात जन्माला आलो, लहानाचा मोठा झालो, येथे शिकलो,येथेच माझे व माझ्या कुटुंबाचे पोट भरत आहे. मग माझ्यावर सुद्धा सामाजिक दायित्व आहे, मी या समाजाला काही देणे लागतो, ते माझे कर्तव्य आहे हा विचार असावा. देहाचा विचार करू नये, त्याचे सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करू नये. त्या ऐवजी गुण वाढवावेत.

जी माणसे आपल्या हुशारीने, कर्तृत्वाने समाजात कार्य करतात अशा विभूतींना समाजात मनाचे स्थान असते व ते टिकाऊ असते. रूप संपदा दोन दिसांची। रूपाच्या मागे समाज फारकाळ धावत नाही. शरीर उत्तमपणे शृंगारले पण समाजाच्या उपयोगी आलेच नाही तर काय फायदा? (ओवी ९)

त्यामुळे आतून सजावे. संपदा मेळवून भोगावी। सावकाश। उत्तम ज्ञान हीच संपत्ती आहे. ती असेल तर समाजासाठी कार्य करता येते. कार्य केले की लोकसंग्रह वाढतो. ज्ञान आणि लोकसंग्रह हीच खरी संपत्ती आहे. ती मिळवावी आणि तिचा उपभोग घ्यावा (ओवी १०)

जो स्वतः शिकत नाही,कष्ट करत नाही, सदा कोपिष्ट असतो त्याची समाजात किंमत रहात नाही. जसे वागू तसा प्रतिसाद मिळतो. माग लोक आपल्याला अनुकूल व्हावेत का प्रतिकूल यावर विचार करावा. अनुकूल व्हावेत यासाठी प्रयत्न करावा. संबंध जोडण्यास शिकावे. जोडणे नेहमी अवघड असते आणि तोडणे सोपे असते. आपल्याला माणूस जोडायचा आहे, तोडायचा नाही. जसा साद तसा प्रतिसाद! अरे म्हटले की का रे! येणारच. हे समजते तरी पण आपण असे का वागतो? (ओवी ११ ते १७)

उत्तम विचार हा मनाचा शृंगार आहे तर वस्त्रामुळे शरीर सजवले जाते. यात श्रेष्ठ कोण? हा विचार करावा. मी शरीराने सजलो तर त्याचा समाजाला काय उपयोग? फायदा? हुषारीच समाजाला उपयोगी पडते. (ओवी १८, १९)

उत्तम खावे, उत्तम जेवावे, सर्वांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटतेच ना! मग लोकांसाठी झिजू का नये? जेथे करी थांबलेले असते, अडचण असते, संकट असते तेथे आधी धावत जावे, यथाशक्ती, यथामती उपयोगी पडावे. दुसरा कसा आनंदी होईल, समाधानी होईल याचा विचार करून त्यानुसार वर्तन करून दुसऱ्यास आनंद द्यावा. दुसऱ्यासाठी कष्ट घ्यावेत. मीच जर स्वार्थी पणाने वर्तन केले तर मी तरी सुखी होईन का? (ओवी २० ते २४)

समजले आणि वर्तले -- महत्वाचे काय हे आपल्याला समजले पाहिजे. उत्तम गुणांचा अंगीकार करून समाजास उपयोगी पडावे. ज्याला हे समजले तोच भाग्यवान! ज्यांना हे समजले नाही ते दुर्दैवी! (ओवी २५)

जितुका व्याप तितुके वैभव। असे श्रीसमर्थ सांगतात. व्याप तितका संताप हे त्याना मान्य नाही. व्याप करावा तितके वैभव वाढते आणि हीच संपत्ती आहे. आळसाने वागले तर अपयश पदरी येते , प्रयत्न केला तर वैभव वाढते. वैभव म्हणजे लोकसंग्रह. सर्वांमध्ये राहून कार्यरत व्हावे, त्यांना कार्यरत करावे. असे केले तर कार्य सिद्धीस जाते. ज्याला हे समजत नाही तो अज्ञानी समजावा. आपण स्वार्थीपणाने वागलो आणि दुसऱ्यास दुखावले तर एकटे पडण्याची वेळ येते. मग एकटे पडल्यावर यशप्राप्ती नाही. त्यामुळे असे वागावे की उत्तम गुण अंगी बाणल्यामुळे त्याचा फायदा समाजाला होईल, माझे आयुष्य सार्थकी कसे होईल याचा विचार करावा. त्यानुसार समाजास उपयोगी पडावे. समाजाला शहाणे करावे, गरजू लोकांना मदत करावी, त्यांना सुखी करून त्यांना पारमार्थिक मार्गास लावावे. त्यासाठी प्रयत्न करावा.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।