प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी हे सांगणारा हा समास आहे. विमळ म्हणजे शुद्ध. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही योग्य प्रकारे करता यायला हवेत,उत्तम करता यायला हवेत. मग उत्तम म्हणजे काय? जे उत्तम आहे ते शुद्ध असतेच आणि जे शुद्ध आहे ते कायम उत्तम असतेच.

आपण सर्वजण प्रापंचिक आहोत. आपला संसार सुखाचा, आनंदाचा व्हावा यासाठी सतत धडपडत असतो. पण तसा तो होतो का? असतो का? उत्तर आहे नाही, कारण काहीतरी कमीपणा राहतोच.मग का रहातो?

मग अपयश आल्यावर आपण परमार्थाकडे वळतो यश येण्यासाठी! आपली एक समजूत असते मला जर प्रपंच करायचा असेल तर परमार्थ करता येणार नाही. त्यामुळे आता मी मोकळा आहे, आता जबाबदाऱ्या काहीच नाही, वेळ आहे, वेळ जात नाही, निवृत्त झालो आहे आता देवाचे काहीतरी करू असा मोठा गैरसमज नव्हे घट्ट धारणा उराशी बाळगून प्रपंच करत असतो. परमार्थ फक्त तोंडी लावण्यासाठी असतो. यश, अपयश याच्या हिंदोळ्यावर झुलत असतो. इथेच खरी गडबड होते. मग प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालायची तरी कशी? याचे उत्तर हा समास देतो. मग पाहू या हा समास ----

पहिलीच ओवी बहुतेकांना माहीत आहे --
आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावे परमार्थ विवेका।
येथे आळस करू नका।
विवेकी हो ।। १ ।।

या ओवीची सुरवात "आधी" या शब्दापासून होते. याला अर्थ आहे. श्रीसमर्थ प्रपंच आधी करा असे सांगतात. प्रपंच म्हणजे फक्त आपले कुटुंब नव्हे. त्यात सर्व आले - मी,माझे कुटुंब,नातेवाईक,सगेसोयरे,शेजारी,मित्रमंडळी सर्व काही. त्यांच्याशी असलेला व्यवहार,नाते, कर्तव्य उत्तम करत पुढे जायचे आहे, आलेल्या जबाबदाऱ्या न नाकारता योग्य प्रकारे पार पाडायच्या आहेत. हे सर्व करताना डोळे उघडे ठेवून वागायचे आहे. याचा अर्थ नेटक. म्हणजे योग्य प्रकारे,योग्य मार्गाने नेटाने नव्हे. हे करताना अनेक अनुभव गाठीशी येतात.चांगलेवाईट दुःखद,आनंदाचे सर्व अनुभव गाठीशी जमा होत असतात, होतात. त्यातून एक लक्षात येते की मी कितीही सर्वोत्तम केले तरी चांगुलपणा येत नाही,कुठेतरी कमी राहून जाते. नावे ठेवली जातातच. त्यामुळे प्रपंच नको वाटू लागतो. कारण त्यात काहीतरी कमी आहे हे जाणवू लागते मग आपली आसक्ती कमी कमी होते आपले मन प्रपंचात रमत नाही, मग आपण अध्यात्माकडे वळतो. ही आसक्ती कमी झाल्याशिवाय परमार्थ नाही, हा झाला परमार्थातील विवेक. माझ्यावर असलेल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे हा झाला प्रपंचातील विवेक आणि कशात आसक्ती ठेवायची नाही हे समजणे म्हणजे परमार्थातील विवेक. पण दोन्ही करताना कंटाळा करायचा नाहीये, कारण आता आपण विवेकी आहोत.

ओव्या २ ते ५ मध्ये जर प्रपंचाकडे नीट लक्ष दिले नाही तर काय होते हे सांगितले आहे.
ओवी ६ मध्ये दुःख हाच प्रपंचाचा गुणधर्म आहे व ते नको असेल तर पारमार्थिक मार्ग स्वीकारायला हवा असे ७ व्या ओवीत सांगितले आहे. प्रपंच करायचाय पण त्यात गुंतायचे नाही (involvement without attachment) असे वागावे ,

प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणी सावधानता हा गुण असला पाहिजे. अन्यथा यश येणार नाही. मग सावधपणा किती आणि कसा असावा हे आपल्याला ११ वी ओवी सांगते. पर्णाळी म्हणजे पानावरील अळी. हिचे उदाहरण श्रीसमर्थ देतात. ही अळी हालचाल करताना, पुढे जाताना पुढचा आधार आधी घेते मग मागचा भाग उचलते. ( अळी कशी पुढे सरकते हे सर्वांनी पाहिले असेलच) त्यानुसार आपण प्रपंचात वागले पाहिजे. सावधानता अशी हवी, असा विचार हवा. होणाऱ्या परिणामाचा विचार करून पुढचे पाऊल टाकावे. बोलताना विचार करावा. थोडक्यात सर्व बाबतीत सावध असावे.

पुढच्या ओवीत ( ओवी १२) मध्ये दिर्घसूचना असावी असे सांगतात. दिर्घसूचना म्हणजे भविष्याचा विचार करून आजच आखणी करणे. चाळणा म्हणजे सततचा विचार, योग्य अयोग्य पाहणे. उद्या माझ्या मुलाचे शिक्षण आहे,मुलीचे लग्न आहे, मला घर घ्यायचे आहे अशा अनेक अनेक गोष्टी आपल्या समोर असतात. माझी सेवानिवृत्ती आहे. नंतरचा चरितार्थ आहे. यासर्व गोष्टी माझ्या आयुष्यात येणार आहेत, मग त्यासाठी आत्ताच मी तजवीज करायला हवी तरच पुढे अडचण निर्माण होणार नाही हा विचार म्हणजे दिर्घसूचना. जे असे वागतात ते यशस्वी होतात, जे वागत नाहीत ते दुःखी होतात. मग माझ्यातील अवगुण मला टाकले पाहिजेत हा विचार मनात असायला हवा. अवगुण टाकावेत.

जे असा विचार करून जगतात ते यशस्वी होतात. हाच गुण परमार्थात उपयोगी पडतो. माझा जन्म हा माझे स्वस्वरूप ओळखण्यासाठीच आहे अन्य कशासाठी नाही हे समजले पाहिजे. पण माझ्या वाटेला आलेला प्रपंच मला योग्य प्रकारे करत पारमार्थिक वाटचाल करायला हवी हे समजले पाहिजे. कशात गुंतायचे नाही, पण सर्वांचे करायचे आहे याचे भान हवे. मी आजच पारमार्थिक गुंतवणुकीस सुरवात करायला हवी हे समजायला हवे. सर्व काही झाले आता जप करू म्हटले तर होत नाही कारण शरीर त्यावेळी साथ देत नाही. लवकरात लवकर पारमार्थिक मार्गावर यावे, त्यामुळे प्रपंचात मन जास्त गुंतत नाही, पण कर्तव्ये उत्तमपणे पार पाडली जातात. मन सहजपणे सर्वातून सुटते, अडकत नाही, दुःख होत नाही. वागण्यात, बोलण्यात सहजता येते. मग विवेकाचा अर्थ नक्की समजतो. असा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही ठिकाणी समतोल साधावा. हा साधताना प्रपंचाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही.
अशा प्रकारे हा समास बरेच काही शिकवून जातो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।