प्रवेश या वर्षाचा अखेरचा समास. अतिशय विलक्षण! सुरवातीला म्हणजे पहिल्या स्वाध्यायात आपण एक ओवी अभ्यासली - मनास होय विश्रांती।समाधान।। विश्रांती आणि समाधान याचा अर्थ या समासात समजतो. कसा ते पाहू या ---
या समासातील ओवी १ पासून २५ पर्यंत परब्रह्माचे वर्णन आहे. ते कुठे आहे, कसे आहे, कसे अनुभवावे, अनुभवल्यावर काय होते या सर्वांची उत्तरे या समासात सापडतात.
प्रश्न १. परब्रह्म कुठे आहे? ते सर्वत्र आहे, अशी कोणतीही जागा नाही की ते नाही. सर्वत्र भरून आहे. पण ते सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही, हाती लागत नाही, स्पर्श होऊ शकत नाही. सर्वत्र आहे हे समजण्यासाठी श्रीसमर्थ उदाहरण देऊन समजवतात. माझ्या समोर आहे, पाठीमागे आहे, डोक्यावर आहे, सर्वत्र आहे.
या गोष्टी समजण्यासाठी कल्पना करावीच लागते, अन्यथा गोंधळ उडतो. आपण सर्व गोष्टी पाहू शकत नाही पण संशोधक सांगतात म्हणून आपण ते खरे मानतोच ना! ब्रह्म अनुभव संत मंडळींनी घेतला व नंतरच सांगतात. ते अनुभवाचे बोल असतात. ते नेहमी खरे मानावेत.
ब्रह्म सर्वत्र आहे म्हणजे काय? समजा एक फुगा समुद्रातील पाण्याने भरला व भरलेला फुगा समुद्रात बुडवला. आत पण पाणी आणि फुग्याच्या बाहेरपण पाणीच असते. त्यानुसार आपल्याला ब्रह्म व्यापून आहे. चिकटून आहे. या ब्रह्माला कोणी परब्रह्म म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोण परमेश्वर म्हणतात, कोणी देव म्हणतात.
आता पुढचा विचार करू -- फुगा म्हणजे रबराची छोटी पिशवी की जिच्यात हवा,पाणी काहीही भरता येते. हे रबराचे आवरण म्हणजे आपला देह. फुग्यातील आतली हवा किंवा पाणी म्हणजे परब्रह्माचा लहान अंश त्याला आत्मा,अंतरात्मा म्हणतात. फुगा फुटला तर आतील पाणी समुद्रात मिसळते, फुग्यातील पाणी आणि समुद्रातील पाणी वेगळे सांगता येत नाही. त्यानुसार माणूस मरतो त्यावेळी हा आत्मा आणि परब्रह्म पुन्हा एक होतात, वेगळेपण रहात नाही.
याचा अर्थ माझ्यातील ब्रह्म आणि बाहेरील ब्रह्म एकच आहेत म्हणजे माझ्यातील ईश्वर आणि बाहेरील ईश्वर एकच आहेत, वेगळे नाहीत. याचाच अर्थ मी ब्रह्मस्वरूप आहे. पण मला ते उमगत नाही, म्हणून मी ईश्वराला तीर्थक्षेत्री शोधतो पण मला तो सापडतच नाही (ओव्या ७) तुज आहे तुजपाशी।परंतु जागा चुकलासी।।
पक्षी आकाशात उडतो त्यावेळी त्याच्या भोवती सर्वत्र आकाशच असते, त्यानुसार परब्रह्म आपल्या भोवती आहे. ते चिकटलेले आहे (फुग्याचे उदाहरण) ब्रह्म अतिशय शुद्ध,पवित्र आहे. पूर्ण ब्रह्मान्ड व्यापून आहे. त्याला अन्य उपमा देता येत नाही.
ते कुठे कुठे व्यापून आहे याचे वर्णन ओवी १२ व १३ मध्ये आहे.
ब्रह्माचे गुणवर्णन ओवी १४, १५ मध्ये आहे.
ब्रह्म कसे गच्च भरून आहे याचे वर्णन ओवी १७ मध्ये आहे, ते फारच अप्रतिम आहे.
आकाशाचा डोहो भरला। कदापि नाही उचंबळाला।
किती सुंदर! डोह गच्च भरला आहे,वारा नाही तर कसे दिसेल? तसे ब्रह्म गच्च भरून आहे. इतके सुंदर वर्णन श्रीसमर्थच करू जाणे!
ओवी १८ मध्ये "भासेविण निराभास।" अशी शब्दरचना आहे. मृगजळ दिसते, हे दिसणे म्हणजे भास. पण हा भास कोणाला होतो? तर डोळ्यांना म्हणजे इंद्रियांना. पण ब्रह्म इंद्रियांना जाणवते का? नाही. म्हणजे "भासेविण" . आता पुढचा विचार - निराभास चा अर्थ पाहू. भास कोणाला होतो? मनाला. पण मनाला सुद्धा ते समजत नाही,आकलन होत नाही व ते आहेच आहे, म्हणजे -- भासेविण निराभास. ( याचा शांतपणे विचार करावा, हा अर्थ पाऱ्या सारखा आहे , समजल्यासारखा वाटतो पण सटकतो )