नामस्मरण भक्ती. नवविधा भक्तिमधील तिसरी भक्ती. भक्तीचे नाव नामस्मरण का? याचे उत्तर विस्मरण होते, स्मरण होत नाही म्हणून नामस्मरण. मग कोणाचे विस्मरण होते? तर ते नामाचे म्हणजे भगवंताचे! ते सतत राहावे म्हणून नामस्मरण.

समासाच्या सुरवातीलाच म्हणजे दुसऱ्या ओवीत श्रीसमर्थ नांमस्मरणाची व्याख्या सांगतात. अतिशय सोपी पण आचरणात न येणारी - नामस्मरण म्हणजे "स्मरण देवाचे करावे।" देवाची सतत आठवण म्हणजे नामस्मरण. पुढे सांगतात "अखंड नाम जपत जावे।" खंड पडता कामा नये. मग त्याने समाधान प्राप्त होणार आहे. मग प्रश्न असा पडतो की केव्हा नाम घ्यावे आणि कोणाचे घ्यावे? नाम कोणाचेही घ्यावे - आपल्या उपास्य दैवताचे घ्यावे,कुलस्वामी चे घ्यावे, आवडत्या देवाचे घ्यावे कोणत्याही देवाचे नाम घ्यावे. त्यानुसार सर्व पाणी समुद्राला जाऊन मिळते त्यानुसार कोणत्याही देवाला केलेला नमस्कार ईश्वराला पोहोचतो. फक्त त्यात आर्तता हवी उपचार नकोत.

नाम केव्हा घ्यावे? याचे उत्तर ५ ते १० या ओव्यांमध्ये दिले आहे. स्वयंपाक करताना नाम घ्यावे, पूजा करताना नाम घ्यावे, ऑफिस मध्ये गेल्यावर भगवंताला नमस्कार करून कामाला सुरुवात करावी. घराबाहेर पडताना नमस्कार करून बाहेर पडावे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती। असे त्यास सांगावे. सकाळी उठताना मोबाईल हातात घेऊन गुडमॉर्निंग ना पाठवता आधी देवाला नमस्कार करावा, तुझ्या मुळे आजचा दिवस मी पहात आहे, दिवसभर तुझी आठवण राहू दे अशी मनापासून प्रार्थना करावी. झोपताना नमस्कार करून देवाला आपल्या हृदयात विश्रांती घेण्यास सांगावे मग जप करत करत झोपावे. आहे ना सोपे! पण आपण ते करत नाही म्हणून नामस्मरण.

मग नाम घेतल्याने काय होते याचे उत्तर ११ ते १३ या ओव्यांमध्ये दिले आहे. तसेच १९,२०,२१,२२ या ओव्यांमध्ये दिले आहे.

ओवी १५ ते १८,२३ मध्ये कोणी कोणी नाम घेतले हे सांगितले आहे.

उफराट्या नामसाठी। वाल्मिकी तरला उठाऊठी।
ही ओवी पाहू. यातील उफराटे नाम याचा अर्थ पुढील प्रमाणे --- परा, पश्चन्ति, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार प्रकार आहेत. आपण बोलतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. त्याची जागा तोंड ही आहे. आता वाचा म्हणजे वाणीचे कार्य कसे होते ते पाहू. आपल्या नाभीपाशी शुद्ध स्फुरण असते म्हणजे अहं ब्रह्मास्मि ची शुद्ध जाणीव नाभीपाशी असते. त्याला परा वाणी म्हणतात. ती शुद्ध स्वरूपात असते. ती ज्यावेळी वर सरकते त्यावेळी तिला अर्थ प्राप्त होतो ते स्थान हृदयापाशी असते. त्या वाणीला पश्चन्ति म्हणतात. अर्थ प्राप्त झालेले स्फुरण अजून वर सरकते तेथे त्या स्फुरणाचे नादात म्हणजे आवाजात रूपांतर होते,ध्वनी निर्माण होतो. ती जागा कंठात असते, तिला मध्यमा म्हणतात व तो ध्वनी मुखावाटे बाहेर पडतो त्याला वैखरी म्हणतात, व्यावहारिक भाषेत त्याला आवाज,बोलणे असे म्हणतात. आपल्या अनेक इच्छा असतात त्याला वासना म्हणतात. ही वासना मध्यमेपर्यंत साठलेली असते. म्हणजे वासनेचा अडथळा असतो. जो पर्यंत ती वासना विरत नाही, नाहीशी होत नाही तोपर्यंत परेपर्यंत पोहोचता येते नाही, अहं ब्रह्मास्मि चा अनुभव येत नाही. पण नाम घेतल्याने ही वासना जसजशी उपासना वाढेल तसतशी विरत जाते व आपले नाम परेपर्यंत जाऊन पोहोचते व आपल्याला मीच ईश्वर हा अनुभव येतो. हा अनुभव, ईश्वर सूक्ष्म आहे. म्हणजे वाणीचा प्रवास सूक्ष्मातून स्थुला कडे म्हणजे परे कडून वैखरी पर्यंत आहे. म्हणजे मार्ग परे कडून वैखरी असा प्रवास असतो. त्याच्या उलटा प्रवास म्हणजे वैखरी पासून परेपर्यंत असतो. या उलट्या प्रवासाला उफराटा म्हणतात म्हणजे उलटा प्रवास! वालयकोळ्याने या दृश्य जगात मुखावाटे नाम घेतले इतके घेतले की हळूहळू शरीर शुद्धी झाली व त्याचे नाम परे पर्यंत जाऊन पोहोचले व त्याचा वाल्मिकी झाला. तो ब्राह्मस्वरूप झाला. त्याचे सद्गुरू नारदमुनी. त्यांच्यावर विश्वास ठेवून नाम घेतले व स्वतःचा उद्धार केला. त्यानुसार आपल्या सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून नाम घ्यावे.

ओवी १९ - नामस्मरण करीता येमे। बाधिजेंना।।
यमाची बाधा होत नाही. म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपण सुटतो. नाम घेतल्याने माणूस मुक्त होतो, पुन्हा जन्म नाही. मग मृत्यू नाही मग यमाची बाधा नाही.

नाम कोणीही घेऊ शकतो. चारही वर्णातील कोणीही नाम घेऊ शकतात. येथे जातीभेद नाही. जातीभेद हे माणसाने निर्माण केले आहेत ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी! कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वजण देवाची लेकरे आहेत. सर्वाना नाम घेण्याचा अधिकार आहे.

असा हा समास आहे. आपण काय घ्यायचे --- सतत नाम घ्यावे, मनापासून घ्यावे. कोणत्याही कार्यात त्याची इच्छा म्हणावे. कोणतेही काम करताना त्यावर नामाचा शिक्का मारावा मग कार्य करावे. कार्य केल्यावर जे काही होईल त्यात त्याची इच्छा म्हणावे. कार्य करताना,झाल्यावर, कार्य करण्यापूर्वी ईश्वराचे स्मरण करावे. मग करू या प्रयत्न!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।