रोजच्या जगण्यात अपयश येणारी माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, थोड्याफार प्रमाणात अपयशी आपणसुद्धा असतो. यश येत नाही, त्यामुळे कोणी विचारत नाही, त्यामुळे धड जीवन जगता येत नाही. परिणामी कोणी सगे सोयरे विचारत नाहीत, किंमत देत नाहीत. लोक टाळतात . अपयशाचा कंटाळा येतो, काय करावे कसे जगावे हेच समजत नाही, यशाचा मार्ग दिसत नाही. कधी कधी तर जीव द्यावा असे टोकाचे विचार मनात डोकावतात. मग त्यासाठी काय करावे? याचे उत्तर श्रीसमर्थ या समासातून देतात. पण त्यासाठी आधी स्वतःला विचारपूर्वक बदलायला हवे, अयोग्य वर्तणूक सोडायला हवी. असे वागणे अंगवळणी पडल्यामुळे प्रयत्नपूर्वक बदल घडवावा लागतो म्हणून समासाचे नाव यत्नशिकवण.
अपयश येण्याचे पहिले मुख्य कारण आपली चूकीची जीवनशैली. त्यामुळे जीवनाला शिस्त लागत नाही. आपली दिवसाची सुरुवात सकाळी होते म्हणून दिनचर्या सांगितली. मूलभूत वागण्यात बदल हवा. पहाटे उठावे. ईश्वराचे स्मरण करावे त्यामुळे सकारात्मक विचार मनात येतात व त्यामुळे उत्साह वाढतो. करून बघा हे! मग शौचमुखमार्जन करून स्नान करून देवपूजा करावी. अल्पोपहार करून आपल्या नोकरी/ व्यवसायास सुरवात करावी. आपल्याला नक्की काय करायचे आहे हे ओळखून त्यानुसार निर्णय घेऊन काम करावे, ते करताना त्यात पूर्ण एकाग्रता बाळगावी, सर्वांशी गोड बोलावे. कामात सावधानता असावी. नितीमर्यादेने वागावे. नियम माहीर करून कार्य करावे. मग त्यात यश येते. यश यायला लागल्यावर हळूहळू लोक आपल्या भोवती जमतात. कारण आपण यशस्वी आहोत. असतील शिते तर जमतील भुते हा जगाचा नियमच आहे. पण आपण त्याने हुरळून न जाता त्यांना मार्गदर्शन करावे.
श्रीसमर्थ कायम समाजाचा विचार करण्यास सांगतात. कारण आपण समाजात रहातो, त्याचे दायित्व आपल्यावर असते याचे भान असले पाहिजे. त्यामुळे समाजासाठी झिजावे, मी सुखी झालो, यशस्वी झालो. मग समाज कसा सुखी होईल, यशस्वी होईल याचा विचार करावा. त्यांना व्यवहार सांगता सांगता परमार्थाकडे वळवावे. आदर्श समजावून सांगावा. लोक आपल्याकडे समस्या घेऊन येतात. त्या ऐकून घ्याव्यात. माणसाला कटकट ऐकायला कधीच आवडत नाही. पण आपण तसे करू नये, त्यांना बोलून द्यावे, त्यांचे ऐकावे. मग त्यांचे समाधान होईल असे काही सांगावे. त्यांना आवडेल असे बोलावे. आणि योग्य मार्गावर आणावे. पण आपल्या बोलण्याचा कंटाळा त्यांना येणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्याकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नये, काही मागू नये. त्यामुळे आपली किंमत वाढते. त्यांच्या पुढे श्रीरामाचा आदर्श उभा करावा. कारण सर्वार्थाने रामकथा ही आदर्श आहे. ती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. केव्हा काय सांगायचे हे समजले पाहिजे, प्रसंग ओळखता यायला हवा. असा सर्वांगीण विचार करून वर्तन केले तर आयुष्यात यशस्वी होता येते. लोक आपलेसे म्हणू लागतात. मग असे झाले की आयुष्यात कशाचीच कमी उरत नाही.
रामकथा ब्रह्मान्ड भेदून।पैल्याड न्यावी।।
असे श्रीसमर्थ सांगतात. राम कथाच का? याचा अर्थ समजून घेऊ या.
जीवनात अयशस्वी माणसास स्वतःत कसा बदल कर म्हणजे यश येईल हे आधी श्रीसमर्थ सांगतात. त्याचे यश पाहून समाज त्याच्या भोवती जमणार आहे. श्रीसमर्थ कायम समाजाचा विचार करतात. आपण त्यात राहतो,मोठे होतो,पोट भरतो, जीवनक्रम समाजात राहून करतो. त्यामुळे समाजाचे ऋण हे आपल्यावर असते, ते फेडावे लागते. श्रीसमथ येथे ती जाणीव करून देतात. मला मिळालेले यश पाहून लोक जवळ येतात मग तेसुद्धा कसे यशस्वी होतील, योग्य मार्गाने जातील हे आपण पाहायला हवे, त्यांना मार्गदर्शन करायला हवे. मग आदर्श कोण? तर श्रीराम. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे आदर्श आहे. आदर्श मुलगा,आदर्श शिष्य,आदर्श राजा,आदर्श पती,आदर्श भाऊ,आदर्श नेता सर्व काही आदर्श. असा आदर्श आजच्या काळात लोकांसमोर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उत्तम काय हे सांगणे काळाची गरज आहे. अशी ही रामकथा. सर्वदूर पसरावी व त्यानुसार लोकांनी वर्तणूक करावी असे श्रीसमर्थाना वाटते. सर्वदूर म्हणजे कुठपर्यंत तर ब्रह्माडापलीकडे. ही एक उपमा आहे.
भक्ती ज्ञान वैराग्य योग।
नाना साधनाचे प्रयोग।
जेणे तुटे भवरोग।
मननमात्रे।। २२ ।।
जो विभक्त नाही तो भक्त म्हणजे जो सतत ईश्वर स्मरणात असतो तो भक्त. या भक्ताला सर्व ठिकाणी ईश्वरच दिसतो. प्रत्येक गोष्ट तो ईश्वरासाठीच करतो कोणतेही कर्म त्याला अर्पण करतो याला म्हणतात भक्ती.
जे कायमस्वरूपी टिकते त्याला ज्ञान म्हणतात. जे सतत किंवा कालांतराने बदलते त्याला ज्ञान म्हणत नाही. ईश्वर हा कायम स्वरूपी आहे,कधीही न बदलणार आहे. त्यामुळे त्याचे स्वरूप अनुभवणे म्हणजे ज्ञान.
वैराग्य -- वैराग्य ही मनाची अवस्था आहे. शरीराची नाही. भगवे कपडे घातले, भस्म फासले म्हणजे वैराग्य नाही. मनाने सर्व गोष्टींपासून अलिप्त होणे म्हणजे वैराग्य. ईश्वराशिवाय मन कशात गुंतत नाही. जे काही व्यवहार केले जातात ते कर्तव्य म्हणून, खाल्ले जाते ते जगायचे असते म्हणून! पण मन ईश्वराने भरलेले असते.
योग हा शब्द युज या धातूपासून बनला आहे. योग म्हणजे जोडणे. मनाने ईश्वराला जोडणे. ते कसे जोडले जाते? तर नाना साधनांनी. जप,पूजा,मानसपूजा,उत्सव अशा विविध गोष्टी करणे म्हणजे साधना. यात स्मरण,भक्ती सर्व काही येते.
या गोष्टी का करायच्या? तर भवरोग संपण्यासाठी! भव म्हणजे दृश्य जगत. आपण जे डोळ्यांना दिसते तेच सत्य मानतो. सर्व सुख हे देहाभोवती फिरत असते. छान खाणे,छान कपडे,छान घर सर्व काही छान! यासाठी आपण आयुष्यभर झगडतो. पण कायस्वरूपी आनंद मिळत नाही. मिळतो तो कायमस्वरूपी नसतो. या वर्षी आंबा खाल्ला तरी पुढच्या वर्षी खावसा वाटतोच ना! यातच आपण गुंततो. ही सर्व लक्षणे असली की आपल्याला भवरोग झाला हे नक्की. यातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. बरे व्हायचे आहे. रोगमुक्त व्हायचे आहे. त्यावर औषध म्हणजे ईश्वराचे चिंतन, आपण ज्याचा अभ्यास करतो त्याचे चिंतन मनन. पण यात सातत्य हवे. आपले उद्दिष्ट स्पष्ट हवे, मला काय मिळवायचे आहे हे मनात पक्के हवे, दिशा स्पष्ट असावी. यानुसार आपण वागलो तर भवरोग गेलाच म्हणून समजा. या गोष्टींनुसार आपण वागावे व या गोष्टी लोकांना सांगाव्यात. फक्त स्वतःपुरता विचार नसावा. पण आधी आपली कृती असावी मग दुसऱ्याला सांगावी. असे वागणे श्रीसमर्थाना अपेक्षित आहे.
आकलबंद नाही जेथे।
अवघेच विष्कळीत तेथे।
येके आकलेविण ते।
काये आहे।। २८ ।।
आकलबंद म्हणजे हुशारी. बुद्धी असणे.
हा समास आहे तो यत्ननिरुपणावर. आयुष्यात यशप्राप्ती व्हावी म्हणून कसे वागावे हे श्रीसमर्थ सांगतात. त्यानुसार वागले की यश हे मिळणारच! पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की श्रीसमर्थ कधीच फक्त स्वतःसाठी जगायला सांगतच नाहीत. श्रीसमर्थांचा काळ फार कठीण होता. समाज विखुरला होता. मुघल, निजाम,आदिलशाही यांनी धुमाकूळ घातला होता, आस्मानी सुलतानी आली होती. अशा समाजाला श्रीसमर्थांनी उभे केले, मार्गदर्शन केले आणि मार्ग दाखवला. थोड्याफार प्रमाणात आताची परिस्थिती सुद्धा अशी होत आहे. माणूस सुख शोधतो आहे. त्यामुळे जर आपल्याला यश मिळाले तर तो मार्ग आपण दुसऱ्यांना दाखवलाच पाहिजे. आपले यश पाहून वेगवेगळ्या समस्या घेऊन माणसे आपल्यापाशी येतील, मार्ग विचारतील. त्यावेळी व्यक्तीनुसार आपले बोलणे असावे, मार्ग सांगितला पाहिजे. पण तेच समजले नाही तशी बुद्धी नसेल तर काय उपयोग?