डोळे उघडणारा सुंदर समास! श्रीसमर्थ प्रसंगी किती रोखठोक बोलतात, आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून किती कडकभाषेत सूनवतात हे सांगणारा हा समास. आपल्यात बदल व्हावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा! आपल्याला सूनवुन अखेर आईसारखे पाठीवरून हात फिरवतात आणि कडक बोलण्यामागचे कारण सांगतात --
अवगुण त्यागावया कारणे।
न्यायनिष्ठुर लागे बोलणे।
श्रोती कोप न धरणे।
ऐसिया वचनाचा ।। ५४ ।।
असे सांगून समास संपवतात. चला मग या समासाचा बारकाईने अभ्यास करू या.
सर्वात आधी दुश्चित चा अर्थ पाहू या. आपण कधी शांत असतो का? नाही. सतत डोक्यात विचारचक्र सुरू असतात, विचारांची मालिका सुरू असते. म्हणजे एकाग्र नसतो, म्हणजे व्यग्र असतो. आपले मन व्यग्र असते. या व्यग्रतेला श्रीसमर्थ दुश्चितपणा म्हणतात.
हा समास एका प्रश्नाने सुरू होतो " मी एवढा सत्संग करतो, मग मला मुक्ती केव्हा मिळेल? " ( मी दासबोधाचा अभ्यास करतो पण तो मला केव्हा समजेल? दासबोध मला का समजत नाही?त्या नुसार वर्तन का होत नाही? दासबोध म्हणजे श्रीसमर्थांची वाङ्मयीन मूर्ती आहे, म्हणजे श्रीसमर्थ आपल्या बरोबर आहेत)
आपले मन शांत असते परंतु अचानक काहीतरी होते आणि विचारचक्र सुरू होते, मन भरकटू लागते. ज्याप्रमाणे एका शांत तळ्यात दगड टाकल्यावर तरंग उठतात त्यानुसार मनाचे होते आणि आपण दुश्चित होतो, एकाग्रतेचा भंग होतो. ( ओवी ४)
मग काय करावे? तर लगेच सावध व्हावे, मनास बांध घालावा , तसा प्रयत्न करावा. (श्रीसमर्थांना शरण जाऊन प्रार्थना करावी आणि अभ्यासास सुरवात करावी.) एकाग्रता भंग पावली तरी परत श्रवण करावे, अभ्यास करावा. ( ओवी ६)
पण नुसते श्रवण करू नये, नुसते शब्द ऐकू नये, नुसते वाचन करू नये तर गर्भितार्थापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. जर अर्थ न जाणता अभ्यास केला तर तो वेडेपणा ठरेल, त्या अभ्यासाचा काहीही उपयोग होणार नाही, सर्व फुकट जाईल. वर्गात शिक्षक शिकवतात पण विद्यार्थ्यांचे लक्षच नसेल तर शिकवणे वाया जाते, विद्यार्थ्यांला काहीच कळत नाही, त्या शिक्षणाचा काहीही उपयोग होत नाही, विद्यार्थ्यांत काहीही बदल घडून येत नाही, शेवटी शिक्षक त्याला दगड म्हणतात. याच प्रकारे श्रीसमर्थ अशा दुश्चित माणसाला " दगड " म्हणतात. एवढेच नाही तर " तुझ्यापेक्षा दगड बरा, कारण दगडाला आकार दिला ते तो आकार तसाच रहातो, बदलत नाही. पण मनुष्याला कितीही शिकवा, सांगा, उपदेश द्या , काहीही फरक पडत नाही. सुरवातीला तो ऐकतो परंतु काही काळानंतर ये रे माझ्या मागल्या।. परत पाहिल्यासारखा होतो. करुणाष्टकात एक ओवी आहे --
निरुपणी येता सदवृत्ती येते।
स्थळत्याग होता सवेंचि जाते।
काये करू रे क्रिया घडेना।
तुजविण रामा मज कंठवेना।।
ही दुश्चित माणसाची क्रियाच घडत नाही आणि घडत नाही हे त्याला समजतपण नाही. म्हणून तो पाषाण, दगड! ( ओवी ८ ते १२)
पुढे सांगतात की अनेक पाषाण उत्तम असतात, ते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरतात. ( ओवी १३ ते १६) परंतु जो पाषाण कुठेच उपयोगी पडत नाही त्याचे मूल्य शून्य असते. तसे दुश्चित माणसाचे मूल्य शून्य असते. ( ओवी १७,१८)
मग असा माणूस धड प्रपंच करू शकत नाही ना परमार्थ!
ओवी २० ते २८, श्रीसमर्थांनी दुश्चितपणाचे तोटे( वैशिष्टय ) सांगितले आहे. दुश्चितपणा असेल तर मनुष्य कसा वागतो, असतो याचे वर्णन श्रीसमर्थ करतात. दुश्चितपणामुळे कार्यनाश होतो, मनुष्य चिंताग्रस्त होतो, विस्मरण होते, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, साधन थांबते, उपासना बुडते, ज्ञानप्राप्ती होत नाही, निश्चय होत नाही, स्वहित समजत नाही, श्रवण घडत नाही, अर्थ समजत नाही, निरूपण समजत नाही, शांत बसलेला दिसतो पण मन थऱ्यावर नसते. मन सतत धावत असते. सारासार विचार समजत नाही. संसार असून नसल्यासारखा असतो, भरकटत असतो. ( ओवी १९ ते २८) परिणामी अंगात आळस संचार करू लागतो. दुश्चितपणाच्या जोडीला आता आळस आल्यावर काय होते याचे वर्णन ओवी २९ ते ३४ मध्ये फार सुंदर पणे श्रीसमर्थ मांडतात.
श्रीसमर्थ सांगतात -- आळसाहाती प्राणियाला। उसंत नाही।। ( ओवी २९) एवढा मनुष्य आळशी होतो! त्याच्या आळसास सुद्धा वेळ मिळत नाही, एवढा आळस! ही श्रीसमर्थांनी आळसावर " कोटी " केली आहे जेणेकरून आळसाची व्याप्ती समजावी. आळसामुळे विचार रहात नाही, मेंदू कार्य करत नाही, चुकीचे वर्तन होते, अभ्यास थांबतो, नित्यनेम बुडतो, धारणशक्ती नाहीशी होते, धीर धरण्याची ताकद नाश पावते, मनोवृत्ती मलिन होते, मनाच्या विविध शक्ती नाश पावतात, निरूपण/ प्रवचन यांचा फायदा करून घेता येत नाही. पाठांतर होत नाही, श्रवण घडत नाही. असे मोठे नुकसान होते. आता अंगात आळस आहे मग आपोआप त्याच्याबरोबर निद्रा आलीच.
मग दुश्चितपणा, आळस आणि निद्रा या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्याचा नाश करतात, आयुष्य भ्रष्ट होते असे श्रीसमर्थ सांगतात. ( ओवी ३५)
या तीन गोष्टी माणसात असतील तर प्रगती कशी होणार? मनुष्यजन्म सार्थकी कसा लागणार? मनुष्य पोटभर जेवतो मग जेवल्यावर आळस येतो त्यामुळे तो झोपतो. उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. त्यामुळे नुसता नुष्क्रिय बसून रहातो, काहीही करावेसे वाटत नाही. मग आत्महित कसे होणार? ( ओवी ३६ ते ३९)
ओवी ४० मध्ये श्रीसमर्थ परखडपणे विचार मांडतात -- माकडाच्या हाती जर अमूल्य रत्न दिले तर त्याचा काय उपयोग? त्यानुसार एवढा अनमोल मनुष्य देह मिळाला आहे पण दुश्चितपणा, आळस, निद्रा अंगात भरून असेल तर काय उपयोग?
मग जर मुक्ती हवी असेल, स्वस्वरूप ओळखायचे असेल, मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल, प्रपंच नेटका करायचा असेल तर काय करायला हवे? याचे उत्तर श्रीसमर्थ देतात. मनुष्यजन्म भ्रष्ट करणाऱ्या या तीन गोष्टींचा त्याग करून सज्जनांची संगत धरावी. म्हणजे ते सांगतात तसे वर्तन करावे. मग परत प्रश्न येतो " मी तशी संगत धरली, तसे वर्तन केले तर किती दिवसात मुक्ती मिळेल? " श्रीसमर्थ सांगतात " तात्काळ " हे समजावे म्हणून परीस, पाण्याचा थेंब सागरात बुडणे अशी उदाहरणे देतात. एका क्षणात मुक्ती मिळते. ( ओवी ४१ ते ४३)
मग त्यासाठी कसे वागावे याचे सुद्धा उत्तर देतात -- सावध साक्षपी दक्ष। तयास तात्काळची मोक्ष। ( ओवी ४४ ) मनुष्याने सावध राहावे. सर्वार्थाने सावध. सावधपण मज दे रे राम। असे चौपदीत श्रीसमर्थ मागणे मागतात. साक्षेपी म्हणजे उद्योगी, कष्टाळू. तसेच तत्पर असावे. हे गुण अंगी असतील तर मोक्षप्राप्ती लवकर होते. प्रपंचात सावध असावे, कष्ट करावेत, तत्पर असावे. हेच गुण परमार्थात उपयोगी पडतात. हे गुण असतील तरच ब्रह्मप्राप्ती होते. परमार्थाच्या अनुभवामध्ये बुद्धी तयार व्हावी लागते. अत्यंत सूक्ष्म बनवी लागते. अशा बुद्धी बरोबर अनन्यपण हवे. ज्यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत त्यास स्वरूपसाक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. अनन्य श्रद्धा व सुक्ष्मबुद्धी दोन्ही हवे.
सूक्ष्म बुद्धी असेल तर गुह्य अर्थ समजतो. अनन्य श्रद्धा नसेल तर परब्रह्म आकलन होत नाही. सूक्ष्म बुद्धी आणि अनन्य श्रद्धा यामुळे देहाभिमान गळतो, देहबुद्धी गळून पडते. जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयी जागृत आहे, श्रम करण्याची तयारी आहे, बुद्धिमान आहे, श्रद्धावंत आहे त्याला साधनाचे कष्ट करावे लागत नाहीत. ओवी ४७ ते ५० मध्ये मनुष्यात हे गुण असतील तर काय होते याचे चित्रण श्रीसमर्थ रंगवतात.
ओवी ५१ मध्ये अतिशय महत्वाची गोष्ट सांगतात ती म्हणजे जरी मोक्ष मिळाला तरी निरुपणाचा नियम मोडू नये, आपली साधना सोडू नये. असे सांगून पुढील समासाची प्रस्तावना करतात. अशा या सुंदर समासाचा अभ्यास करू व त्यावर चिंतन मनन करू या.