अतिशय विचार करायला लावणारे हे तीन समास! समजायला सोपे पण गर्भितार्थ मोठा असे या तीन समासाचे स्वरूप आहे. विषय रोजच्या जगण्याचा, त्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांचा, शारीरिक व मानसिक त्रासांचा, ज्यामुळे आपण दुःखी होतो, खचतो, उदास होतो. असे का होते? माझ्याच नशिबी हे सर्व का? मी देवाचे एवढे करतो तरी या कटकटी का? असे अनेक प्रश्न रोज सतावतात. एवढी काळजी घेऊन मलाच कोरोनाचा प्रादुर्भाव कसा झाला? या सर्व प्रश्नांची उत्तरे या तीन समासात मिळतात. आपल्याला शारीरिक त्रास होतो, निसर्गामुळे होतो आणि आपल्या कर्मामुळे होतो. मग पाहू या व अभ्यासू या, चला तर मग -----

दशक ३ समास - आध्यत्मिक ताप

या अगोदर आपण स्वगुण परीक्षा याविषयीचे चार समास अभ्यासले. त्यातील दशक ३ समास ५ मधील शेवटची ओवी पुढील प्रमाणे --
भगवतभजनावाचूनी।
चुकेना हे जन्मयोनी।
तापत्रयांची जाचणी।
सांगिजेल पुढे ।। ३-५-५६
याचा अर्थ असा की मी जन्माला आल्यावर मला दुःख हे आहेच. यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी ती ही की त्रास, दुःख, मनस्ताप हा देहाला असतो, शरीराला असतो, आतील अंतरात्म्याला नाही. म्हणजे मला नाही. भोग हे शरीराला असतात, स्वस्वरूपला नाही. परंतु देहबुद्धीमुळे शरीर म्हणजे मी असा माझा समज असतो, त्यामुळे सर्व गडबड होते. ही बाब कायम लक्षात ठेवावी.

या समासातील महत्वाची ओवी पुढीलप्रमाणे --
तैसा संसार दुःखे दुःखवला।
त्रिविधतापे पोळला।
तोचि अधिकारी झाला।
परमार्थासी।। ३-६-७
संसार म्हटला की दुःख आलेच. सतत आनंद नसतो. मग ते दुःख/ त्रास तीन गोष्टीत विभागता येतो - आध्यात्मिक ताप, आदिभूतीक ताप आणि आदिदैवीक ताप. ताप म्हणजे त्रास.

मनुष्य या त्रासावर आयुष्यभर उपाय शोधतो, अनेक प्रकार करतो पण कायमचे सुख कधीच मिळत नाही. मग देवळात जातो, उपवास करतो, नवस बोलतो, पूजा करतो, तीर्थक्षेत्री जातो, साधू कडे जातो, पत्रिका पहातो, अंगठी घालतो, देवाला तेल घालतो , काय करत नाही विचारा? हा सर्व खटाटोप त्रास जावा यासाठीच असतो. जर या गोष्टीकडे बारकाईने पाहिले, विचार केला की असे समजते की आपल्याला देव फक्त फायद्यासाठी हवा असतो. माझे दुःख जावे त्रास जावा म्हणून देव हवा असतो. देवासाठी देव नको असतो.

पण एक क्षण असा येतो की देवा आता तुझ्याशिवाय माझे कोणीही नाही, तूच सांभाळ. तूच तारणहार! अशी संपूर्ण शरणागती हवी. भुकेल्या माणसाला अन्न, आजारी माणसास औषध, मरणाच्या दारात असलेल्या माणसास जीवदान मिळाल्यावर कसे वाटेल तसे संतांची संगत लाभल्यावर होते, परमार्थाचे साधन हातात आल्यावर होते. अशी माणसेच उत्तम परमार्थ करू शकतात कारण त्यांना संसाराचा जळजळीत अनुभव आलेला असतो, संसारातील खोटेपणा अनुभवास आलेले असते, नात्याचा खोटेपणा अनुभवला असतो. मग अशी माणसे निरिच्छ होतात आणि पारमार्थिक वाटचाल सुरू करतात.

पहिला ताप " आध्यात्मिक ताप "
देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते म्हणजे भोगावे लागते त्यास आध्यात्मिक ताप म्हणतात. माणसांना त्यापासून दुःखच होते.
जे जे शारीरिक आजार, व्याधी, साथीचे रोग आहेत ते सर्व या प्रकारच्या तापात येतात. या सर्वांची मोठी यादीच श्रीसमर्थ देतात. यातील कोणता तरी त्रास, व्याधी आपण भोगलेली आहे.

पुढचा ताप आहे " आधिभौतिक ताप "
भूतमात्रांच्या म्हणजे बाह्य पदार्थाच्या संयोगाने जे सुखदुःख निर्माण होते, त्या तापास आधिभौतिक ताप म्हणतात. यातील ताप भौतिक जगातून होतात. प्राणी, पक्षी, निसर्ग, मनुष्य या सर्वांपासून होणारे त्रास या तापात होतात. म्हणजे पंचमहाभूतांपासून त्रास होतो. या तापात सासुरवास पण आहे. पावसात भिंत अंगावर पडते, झाड पडते, भुयार कोसळते. आगीमुळे अंग पोळते. औषधे चुकीची घेतल्याने त्रास होतो. शस्त्रक्रिया होते, त्याचा त्रास. यादी खूप मोठी आहे. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. हा आधिभौतिक त्रासच. शत्रूच्या कैदेत होणारे त्रास, चोरांपासून,गुंडांपासून त्रास याच प्रकारचा त्रास.

तिसरा त्रास आधिदैवीक ताप.
आपल्याला चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्गनरक याचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैवीक ताप असे म्हणतात.

आपण पाहतो की माणूस कसा उन्मत्तपणे वर्तन करतो. त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. परंतु मृत्यूनंतर अशी एक व्यवस्था आहे की त्या माणसाला त्या वाईट कर्माची शिक्षा मेल्यावर नक्की मिळते. ती शिक्षा म्हणजे मरणप्राय यातना असतात पण त्यापासून त्या उन्मत्त माणसाची सुटका होत नाही, त्याला सर्व भोगावेच लागते. या शिक्षांची यादी या समासात दिली आहे. त्या शिक्षा आपण पाहिलेल्या नाहीत तसेच त्या आत्ता दिसत नाहीत. अशा शिक्षा कोणत्या कारणामुळे भोगाव्या लागतात याची यादी सुद्धा या समासात दिली आहे.

या तिन्ही तापांचा अभ्यास करावा म्हणजे यातून कसे बाहेर यायचे, हे ताप होऊच नयेत म्हणून काय करायचे यावर विचार होणे गरजेचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।