पुन्हा एक सुंदर समास, पुनःपुन्हा वाचवा असा! श्रीसमर्थांचे निरीक्षण किती अचूक होते हे हा समास वाचताना समजते. हा समास लहान म्हणजे २० ओव्यांचा आहे पण अर्थ भरून राहिला आहे. प्रत्येक ओवी आपल्याला विचार करायला लावते, आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. हा समास म्हणजे श्रीसमर्थांनी आपल्यासमोर आरसा धरला आहे हे जाणवते आणि आपण कसे आहोत यावर विचार करायला भाग पडते.
चला तर मग .....
पहिलीच ओवी आपल्याला चिमटा काढते आणि दुसरी ओवी खडसावते.
जनाचा लालची स्वभाव।
आरंभीच म्हणती देव ।
म्हणिजे मला काही देव ।
ऐसी वासना ।।

दुसऱ्या चरणातील " देव " म्हणजे देव असा अर्थ आहे तर तिसऱ्या चरणातील " देव " म्हणजे " दे " असा होतो. इथे श्रीसमर्थ विचार करायला भाग पडतात. --- मी देवासमोर उभा रहातो ते कशासाठी? मी देवळात जातो ते कशासाठी? मी तीर्थयात्रेला जातो कशासाठी? मी घरी कोणती पूजा करतो, का करतो? ...... मग देवासमोर उभे राहिल्यावर मनात काय येते? ( उत्तर प्रत्येकाने शोधा , मनातल्या मनात )
मग प्रश्न उभा रहातो की मला नक्की काय हवे आहे -- देव की कोणती वस्तू, फळ, एखाद्या गोष्टीची पूर्तता, तापहरण, व्याधी निरसन, नक्की काय? की मला देवच हवा, तोच हवा दुसरे काही नको. असे विचार असतात का?
दुसरी ओवी खडसावते --
काहीच भक्ती केली नसता ।
आणी इच्छिती प्रसन्नता ।
जैसे काहीच सेवा न करिता ।
स्वामीस मागती ।।

आपण खरंच भक्ती करतो का? देव प्रसन्न होईल एवढी भक्ती, उपासना, साधना, कष्ट करत नाही, संपूर्ण विश्वास नाही, सद्गुरू सांगतील त्यानुसार वर्तन करत नाही मग ईश्वर कसा प्रसन्न होईल? वर आपण नवस बोलून देवास लाच देतो. एवढा खिशातला आहे का हो देव? श्रीसमर्थ हा विचार करायला लावतात. मग पुढच्या ओवीत उपाय पण सांगतात --
कष्टेविण फळ नाही ।
कष्टेविण राज्य नाही ।
केल्याविण होत नाही ।
साध्य जनी ।।

यश हवे असेल तर कष्ट करायलाच हवेत, अगदी बेदम कष्ट. योग्य मार्गाने, योग्य दिशेने, योग्य वेळी. आपण या आधी एक ओवी अभ्यासली आहे --
अचूक यत्न करवेना ।
म्हणोन केले ते सजेना ।
आपला अवगुण कळेना ।
काही केल्या ।।

मनुष्याने सतत कार्यरत राहिले पाहिजे. श्रीसमर्थ या ओवीतून प्रयत्नवाद शिकवतात, दैववादी होऊ नका हे सांगतात. आपण मात्र कष्ट न करता देवसमोर उभे राहून सतत काहींना काही मागतच रहातो, कष्ट न करता!
याचे दुसरे कारण आळस! कष्ट करायचा कंटाळा! त्यामुळे अपयश पदरात पडते. जे प्रचंड मेहनत घेतात, घाम गळतात आणि ध्येयपूर्तीकडे वाटचाल करतात त्यांना भविष्यात सुखाचे दिवस येतात आणि जे कष्ट न करता जवळचा मार्ग स्वीकारतात त्यांचे यश क्षणिक असते ( ओवी ३, ४, ५ )

सहाव्या ओवीत इहलोक, परलोक आणि दिर्घसुचना असे तीन शब्द आले आहेत. इहलोक म्हणजे आपण ज्या जगात जगतो ते. परलोक म्हणजे सूक्ष्म जग जे दिसत नाही ते पण आहे म्हणजेच ईश्वराचे जग म्हणजेच पारमार्थिक जग. दोहींकडे सारखाच विवेक । असे सांगतात. म्हणजे ऐहिक आणि पारमार्थिक जीवनात विवेक हवा. परंतु या ठिकाणी विवेक हा शब्द दोन अर्थाने आला आहे, एक प्रापंचिक विवेक आणि दुसरा पारमार्थिक विवेक. प्रपंचात योग्यअयोग्य, बरेवाईट प्रसंग, निर्णय प्रक्रिया यात विवेक हवा थोडक्यात व्यवहार समजला पाहिजे. आता परमर्थातील म्हणजे प्रलोकतील विवेक -- शाश्वत काय अशाश्वत काय, सत्य काय असत्य काय हे समजले पाहिजे.

दीर्घसुचना - भविष्यात काय होणार आहे यानुसार आत्ताच तजवीज करणे. मग ती प्रापंचिक असो वा पारमार्थिक. आज जर मी बचत केली तर तीच संपत्ती पुढे उपयोगी येईल, आजच जर मी साधना केली तर पुढचा जन्म अजून चांगला येईल हा विचार.

सातवी आणि आठवी ओवी " बचत " कशी करावी आणि तिचे महत्व सांगतात. " मेळविती तितुके भक्षती । " जे मिळवतो ते लगेच संपवून टाकायचे, उधळायचे, जवळ काही ठेवायचे नाही फक्त मजा करून सर्व खर्च करायचे अशी जर वृत्ती असेल तर भविष्यकाळ अतिशय अवघड जातो. इहलोकतील संचित म्हणजे पैसे आणि परलोकातील परमार्थ म्हणजे पुण्य. दोन्ही असणे अत्यावश्यक आहे.

जर दोन्ही नसेल ते जन्म मरणाचे फेरे आहेतच. कारण जवळ पैसे नसतील तर इच्छापूर्ती नाही, त्यामुळे वासना तशाच राहतात आणि परमार्थ नाही म्हणून मुक्ती नाही. मग जन्ममरणाचा फेरा आलाच! ( ओवी ९, १० )

आपण नुसते बोलतो " सर्व काही देव करतो " पण त्यासाठी लागणारा विवेक करतो का? परमार्थात विवेक म्हणजे शाश्वतातून अशाश्वत काढणे, तांदुळातून पांढरे खडे काढणे. मग असे करताना देव म्हणजे नक्की कोण? तो कसा आहे? त्याचे स्वरूप काय आहे? याचा शोध घेणे आवश्यक आहे. देवाचे अवतार खूप आहेत परंतु तो देव नव्हे. तो अवतार आहे, प्रतिमा आहे, मूर्ती आहे पण देव नाही. खरा देव म्हणजे परब्रह्म. श्रीसमर्थ त्याला थोरला देव म्हणतात. त्याला शोधावे म्हणजे तो काय करतो, त्याचे स्वरूप कसे आहे हे समजते. हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. देवाचे खरे स्वरूप न समजल्यामुळे त्याच्यावर बोलणारे खूप आहेत, न समजून बोलणारे बरेच आहेत. मग ईश्वरस्वरूप समजण्यासाठी काय करायला हवे? कष्ट करावेत, सद्गुरूंना शरण जावे, उपासना वाढवावी, विवेक करावा मग ईश्वर कसा आहे हे समजते, मग योग्य दिशेने वाटचाल होते पण ते करण्याची तयारी हवी, कष्टाची तयारी हवी. जे करतात ते योग्य मार्गाने जातात , अन्य उगाच बडबड करतात. स्वतःची चुकीची धारणाच योग्य कशी हे दुसऱ्यास सांगून त्याचीपण दिशाभूल करतात. कुबुद्धी तेचि सुबुद्धी। ऐसी वाटे ।। ही अवस्था त्यांची असते. यामुळे नुकसानच पदरी पडते. ( ओवी १५ ते १८ )

मग अशा वेळी स्वतः विचार करावा, योग्य काय अयोग्य काय हे पहावे, जाणत्यास पुसावे, सद्गुरूंना शरण जावे. जेथे विचार नाही तेथे जाऊ नये, त्याच्या बोलण्याला महत्व देऊ नये. वायफळ बोलणारे खूप असतात. त्यांच्या नादी लागू नये ( ओवी १९ )

इहलोक आणि परमार्थ दोन्हीकडे यश मिळवायचे असेल तर योग्य विचार हवा. विवेक हवा. तरच यश मिळते. कुठे कसे वागावे हे समजले पाहिजे. सर्वच नियम सगळीकडे लागू होत नाहीत, प्रसंगानुरूप वर्तन करणे समजले पाहिजे. हे करताना शाश्वत अशाश्वत हे समजले पाहिजे. जे करतात त्यांना दोन्हीकडे यशप्राप्ती होते.

स्वाध्याय ११ - दशक १८ समास ९ - अंतरदेवनिरूपण

देवाची संकल्पना सांगणारा, देव कुठे आहे, कसा आहे हे सांगणारा हा समास! यातील तत्वज्ञान खूप महत्वाचे आहे, त्यावर सखोल चिंतन हवे, मनन हवे. २५ ओव्यांचा हा समास आणि प्रत्येक ओवी महत्वाची.
चला तर मग, बारकाईने अभ्यास करू ---
पहिली ओवी आत्मा आणि परब्रह्म यातील फरक सांगते. संपूर्ण विश्वात जी शक्ती भरून आहे तिला परब्रह्म म्हणतात आणि त्याचा अंश म्हणजे आत्मा. म्हणजे शरीरातील, जिवातील परब्रह्म म्हणजे आत्मा. परब्रह्म निश्चल आहे पण आत्मा चंचळ आहे. मग आत्मा चंचळ कसा? पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते पण जर पाणी हलले तर प्रतिबिंब म्हणजे सूर्य हालल्यासारखा दिसतो, भासतो पण आकाशातील सूर्य हलतो का? दुसरे उदाहरण पाहू. ट्रेन किंवा एखादे वाहन आपल्या समोरून गतीने पुढे जाते त्यावेळी आतील व्यक्ती हालल्यासारखी दिसते पण प्रत्यक्षात ती व्यक्ती त्या वाहनात बसलेली असते, वाहनांच्या गतीमुळे ती हलते असा भास होतो. त्यानुसार सजीवांमध्ये आत्मा म्हणजे परब्रह्माचा अंश आहे परंतु देह हा चंचळ आहे, विकारी आहे म्हणून आत्मा विकारी आहे असे म्हटले जाते. विकारी म्हणजे बदल होणारा. शरीर लहानाचे मोठे होते, त्यात बदल घडतात, बालपण, युवक, तारुण्य, वृद्धपण अशा अवस्थेतून शरीर प्रवास करते म्हणून ते विकारी! त्यात आत्मा आहे म्हणून आत्मा विकारी.

म्हणजे प्रत्येक शरीरात आत्मा आहे, तो कार्य करत असतो. आता श्रीराम, श्रीकृष्ण वगैरे अवतार आहेत, श्रीविष्णूंनी ते देह धारण केले व कार्य करून अवतार संपवले. जे कार्य केले ते देह धारण करूनच म्हणजे ते सगुण होते. गुणरूप होते. अवतार संपवला म्हणजे शरीर सोडून निघून गेले, शरीराचा त्याग केला. मग जर शरीराचा त्याग केला, शरीर नाहीसे झाले तर ते देव कसे? देव तर नाहीसा होत नाही. हा प्रश्न निर्माण होतोच. याचेच उत्तर श्रीसमर्थ य समासात देतात. श्रीसमर्थ सांगतात की शरीर धारण केलेले देव हे खरे देव नाहीत. आपल्या हिंदू धर्मात अनेक देव आहेत, प्रत्येकाचे देव निराळे आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या देवास ईश्वर मानतो. परंतु " तो " खरा देव नाही. मनाच्या श्लोकात श्रीसमर्थ सांगतात --

जया मानला देव तो पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोणी न पाहे ।
जगी पाहता देव कोट्यानुकोटी।
जया मानली भक्ती तेचि मोठी ।।
या समासात सगुण आणि निर्गुण यातील फरक सांगत आहेत, सगुणातून निर्गुणाकडे कसे जायचे हे सांगत आहेत.
मग नक्की देव कसा आहे? हे पहायला हवे.

आपण तीर्थक्षेत्री जातो तेथे देव पाहतो. देव पहातो म्हणजे तेथील मूर्तींचे दर्शन घेतो आणि तोच देव असे म्हणतो. प्रत्येक क्षेत्रातील देव भिन्न, भिन्न आकार, भिन्न स्वरूप! त्या स्वरूपाचा विचार केला की ते अवतार आहेत हे समजते. तसेच कधीं ना कधी हे अवतार संपले आहेत याची जाणीवसुद्धा होते. म्हणजे ज्यांनी देह धारण केला तो आज ना उद्या नाहीसा होणार आहे, अस्तित्व संपणार आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा असेच देव आहेत. मग या देवांवर कोणाची सत्ता आहे? मग त्यांच्यापेक्षा कोणता देव मोठा?

तिन्ही लोक जेथून निर्माण झाले।
तया देवरायासी कोणी न बोले ।
जगी थोरला देव तो चोरलासे ।
गुरुवीण तो सर्वथाही न दिसे ।।
श्रीसमर्थांचा अभंग आहे ---
ब्रह्मा विष्णू रुद्र जयाचे अवतार।
तोचि देव थोर जाण बापा ।। १ ।।
जाण बापा देव देवांसी निर्मिता ।
तो एक तत्त्वता ठाई पाडी ।। २ ।।
ठाई पाडी देव साधूंचे संगती ।
दास म्हणे गती पावशील ।। ३ ।

मग खरा देव कोण? तो कुठे असतो? तो सर्वत्र भरून आहे तर माझ्यात आहे का? असल्यास कुठे आहे? तो माझ्यात कोण म्हणून रहातो?
जो माझ्यात देव आहे त्याला अंतरात्मा म्हणतात. तोच कर्ता आहे, भोक्ता आहे आणि तेच माझ्यातील तत्व आहे. जे तत्व माझे शरीर चालवते तेच तत्व या विश्वात कार्य करते. त्याचीच सत्ता सर्वत्र चालते. त्याला ओळखणे म्हणजे विवेक करणे. हीच गोष्ट सर्व वेद सांगतात. त्याला आत्मा सुद्धा म्हणतात. हा आत्मा म्हणजेच अंतरात्मा. तोच शरीर चालवतो. त्यालाच जाणीव म्हणतात. त्याची प्रचिती म्हणजे अनुभव घ्यावा.

परंतु आपण हा शोध घेतच नाही आणि त्याचा शोध घेण्यासाठी तीर्थक्षेत्री जाऊन देव शोधत बसतो. तुज आहे तुजपाशी। परंतु जागा चुकलासी । अशी आपली अस्वस्था! आपण त्या तत्वाचा शोधच घेत नाही. येथे स्नान करतो, मूर्तीचे दर्शन घेतो पण त्या मूर्तीतील देव पहात नाही. उलट त्या देवाची मूर्ती/ फोटो दुकानातून विकत घेतो आणि त्यालाच देव मानतो. म्हणून मुर्खस्य प्रतिमा देव। खरा देव समजतच नाही. परंतु ज्याला खरा देव समजला तो सतसंग धरतो. संत सांगतात त्या मार्गाने जातो. न जाणारा त्या भ्रमातच रमतो.

पण याचा अर्थ असा नाही की श्रीसमर्थ मूर्तिपूजा मानत नव्हते, त्यांचा तीर्थक्षेत्री जाण्यास विरोध होता. असे मुळीच नाही. तेच सांगतात -- सगुणाचे नी आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे ।। सगुणातून निर्गुणाकडे जायचे आहे परंतु तसे आपण करतच नाही, दृश्य जगात, दृश्य वस्तुत अडकून रहातो मग देव कसा समजणार? जे असा विचार करतात ते विवेकी! जो सगुणातील निर्गुण शोधतो तोच विवेकी! तोच परब्रह्मापर्यंत जाऊन पोहोचतो. जे जे आकारास येते म्हणजे जे जे दृश्य जग आहे ते ते आज ना उद्या नाहीसे होणारच आहे, जे दिसते ते शाश्वत नव्हे. परंतु ईश्वर शाश्वत आहे म्हणून तो निर्गुण, अरुप, सूक्ष्म.

या गोष्टींचा प्रत्यय घेणे गरजेचे आहे, त्यावर विचार करणे आवश्यक आहे. जे विचार करत नाहीत, प्रत्यय घेत नाहीत ते आयुष्यभर देव नुसता शोधत बसतात आणि तसेच जग सोडून जातात. आयुष्य व्यर्थ घालवतात.

आपल्याला सगुणातून निर्गुणाचा शोध घ्यायचा आहे. सगुण हे फक्त आलंबन आहे. त्याचा आधार घ्यावा लागतो. तो आधार घेतला की वाटचाल सुरू होते, पण ती करताना हेतू विसरता कामा नये. सगुणाच्या साधनेने चित्त शुद्धी होते, वैराग्य येते, मनाची चंचलता नाहीशी होते. साबणाने डाग जातात म्हणून आपण कायमचा साबण जवळ बाळगत नाही, डाग गेला की साबण बाजूला ठेवतो तसे हे आहे. म्हणजे मुळाशी जाताना सगुणाचा आधार घ्यावा लागतो पण त्यातच अडकायचे नाही. सगुणाचा संग सोडायचा आहे, अखेर शरीराचा संग सोडून स्वतःतील देव म्हणजे अंतरात्मा शोधायचा आहे. ज्यावेळी तो सापडतो त्यावेळी ज्ञानाचे विज्ञान होते. ज्ञानाचे फळ मिळते.

हे होण्यासाठी नित्य काय अनित्य काय हे समजून घ्यावे, त्याचा विवेक करावा, त्यावर श्रवण करावे. असे केल्यावर आंतरदेव नक्की सापडतो, त्याची नक्की अनुभूती येते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।