या समासाचे नाव भीम दशक आहे. श्रीसमर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे मारुतीराय. त्याचे नाव बलभीम. त्यांना अकरावा रुद्र म्हणतात. म्हणून या अकराव्या दशकाला भीम दशक नाव दिले. श्रीमारुती महंतांचे अग्रणी आहेत. सहजसमाधी सांभाळून कर्माचा प्रचंड खटाटोप कसा करावा हे त्यांच्या जीवनावरून शिकावे, म्हणून महंतांचे वर्णन केलेल्या या दशकाला भीम नाव दिले.

या समासात महंतांची निःस्पृह वर्तणूक कशी असते याचे वर्णन केले आहे. निःस्पृह म्हणजे कशात न अडकणार, अलिप्त. त्याच्यात असलेल्या गुणांचे वर्णन येथे आहे. श्रीसमर्थांचा हा महंत निःस्वार्थी आहे, त्यामुळे अशी माणसे समाजात आदर्श निर्माण करतात.

महंताने कसे असावे याचे वर्णन पहिल्या तीन ओव्यात आहे. आपले पाहणे आकुंचित असते, आपण फक्त आपल्यापुरते पहातो. असे जरी असले तरी ज्यानुसार अंतरात्मा कार्य करतो, निःस्पृह राहून कार्य करतो तसा महंत असतो. तो सर्वत्र असतो पण कुठे लिप्त होत नाही. अंतरात्मा हासुद्धा एक महंतच आहे.

महंताने सुद्धा असेच असावे, म्हणजे अंतरात्म्यसारखे असावे हा श्रीसमर्थांचा आग्रह आहे, आणि तसाच महंत असतो.
अशा महंताला सर्वजण ओळखतात. तो सर्वाना माहीत असतो. परंतु त्याची माहिती काढायला गेल्यास कोणालाच त्याच्या बद्धल माहीत नसते. परंतु त्याची कीर्ती मोठी असते. इथे श्रीसमर्थ आपण कसे राहावे, वागावे हे सांगतात. आपण आपल्या दिसण्यास, कपड्यांना अतिमहत्व देतो परंतु समाजास काहीच देत नाही. लोकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काहीच करत नाही , कारण इस्त्री बिघडेल ही भावना असते. मग समाज सुखी कसा होणार? पण हा महंत तसा नाही. समाजकार्य त्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे , समाजास तो सुखी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी झिजतो. एक क्षण असा येतो की त्याच्या दिसण्याकडे, कपड्यांकडे लोकांचे दुर्लक्ष होते, त्याचे मोठेपण लक्षात येते. आपल्या समोरील समस्यांवर त्याचे अखंड मनन चालू असते . ( ओवी ७ )

अशा वर्तणुकीमुळे त्याचा लोकसंग्रह खूप मोठा असतो. पण तेथे वागताना, वावरताना तो फार सावध असतो. ओळखीची माणसे आहेत म्हणून तो तेथे रेंगाळत नाही, त्यांना सोडून नवीन माणसे जोडतो. त्यांचे अंतरंग शोधतो आणि त्यांना सुद्धा जोडतो. पण जुनी माणसे सोडून नवीन जोडणे यामध्ये त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. नवीन प्रांती जाऊन तेथे कार्य करणे हाच हेतू असतो. तो उगाच कुठे अघळपघळ बोलत नाही, अंतर्यामी कोणतीही वासना नसते तसेच एका ठिकाणी तो फारकाळ थांबत नाही. कुठे जाणार आहे हेसुद्धा कोणाला सांगत नाही. आतमध्ये काय सुरू आहे याची कोणालाच कल्पना नसते. तो भावनिक दृष्ट्या कुठेच गुंतत नाही त्यामुळे त्याच्या विषयीच्या धारणा चुकतात. तर्काने सुद्धा त्याला ओळखता येत नाही. हा महंत भगवंताचे सतत गुणगान गात असतो, त्याच्या शिवाय अन्य विषय त्याच्यापाशी नसतो.

असा महंत लोकांना काय शिकवतो व कसे शिकवतो हे श्रीसमर्थ सांगतात. त्यातील काही गोष्टी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. ओवी १६ ते २५ खूप सुंदर ओव्या आहेत, त्यावर चिंतन मनन जरूर करावे.
अखंड येकांत सेवावा।
अभ्यासची करत जावा।
काळ सार्थकची करावा।
जनासाहित।।

आपण हे करतो का? आपण सतत गलबल्यामध्ये असतो. सतत सतत आवाज आपल्या कानावर आदळत असतात. सतत काहीतरी पहात असतो, ऐकत असतो. मग एकांत मिळणार कसा? याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे. आपण तासभर तरी स्वतःसाठी काढतो का? काढल्यावर काय करतो? चिंतन मनन करतो का? एकट्याने राहायची सवय करतो का? लोकांत असलो तरी मनाने अलिप्त असतो का? यावर विचार व्हावा. श्रीसमर्थ तर " अखंड " एकांत सांगतात. तसे राहून अभ्यास करावा, स्वतःला पाहण्यास शिकावे. ध्यान धारणा करावी, जप करावा, उत्तम ग्रंथ वाचावेत. त्यावर चिंतन मनन करावे आणि एकांताचा उपयोग करून घ्यावा. एकांताचा खरा अर्थ फार गुह्य आहे. एकाच अंत म्हणजे एकांत, म्हणजे आपले अस्तित्व सुद्धा विसरायचे आहे. फक्त ईश्वर, ईश्वर आणि ईश्वर. बर जर तो साधला तर त्याचा उपयोग समजतो, फायदा समजतो. तो स्वतःपुरता न ठेवता दुसऱ्यास त्या मार्गास लावावे. हे कार्य महंत करतो.

उपासनेस लावावे जग। लोकांना उपासनेचे महत्व सांगून त्यांना त्यामार्गत आणावे. तसेच निरंतर कामे उरकण्याची लगबग असावी. यात सर्व प्रकारचे कार्य आले, सामाजिक, अध्यात्मिक सर्व काही! याचा फायदा समाजास व्हायला हवा. असे वागले की महंतांच्या शब्दास किंमत येते. लोक त्याचे ऐकू लागतात.

परंतु त्यासाठी आधी कष्ट करावे लागतात अन्यथा सर्व काही वृथा आहे. सतत प्रयत्न करायला हवेत, आळशी राहून चालणार नाही.

हे सामाजिक कार्य करताना अनेक लोकांचा शोध घ्यावा. कारण सर्व कार्य एकट्याने होत नाही. तेथे लोकसहभाग हा तेवढाच महत्वाचा! ते कार्य जर यशस्वी करायचे असेल तर त्यासाठी तशी माणसे शोधावीत. कोणत्याही कार्यासाठी विविध प्रकारची, विविध गुण असलेली माणसे लागतात. त्याच्या त्याच्या कुवतीनुसार त्यांना काम द्यावे. कोणालाही कोणतेही काम सांगून, देऊन चालत नाही. कारण प्रत्येकाचे व्यक्तिमत्व, विचार, बौद्धिक पातळी ही भिन्न भिन्न असते. याची जाण ठेवून जर लोकांना कामास लावले तर कार्यात यश येते. त्यासाठी लोकांना ओळखता यायला हवे, त्यासाठी त्यांच्यात मिसळले पाहिजे. तसेच कार्य संपन्न झाल्यावर बाजूला सुद्धा होता यायला हवे. महंताने असे वागावे.

श्रीसमर्थ सांगतात की हा माझा अनुभव आहे, आधी मी असा वागलो मगच असे सांगत आहे. महंताने सुद्धा असेच वागावे. आधी स्वतः करावे म्हणजे त्या कार्यातील बारकावे लक्षात येतात व त्रुटींवर मात करता येते. त्यामुळे उगाच उंटावरून शेळ्या हाकू नयेत.

अशा प्रकारे प्रत्येक महंताने दुसरा महंत तयार करावा. त्यांना तयार करावे. गोष्टी सांगीन चार युक्तीच्या यानुसार वागून त्यांना परिपूर्ण बनवावे. मग अशा ज्ञानसम्पन्न महंतास विविध भागामध्ये लोकसंग्रह तसेच कार्यास पाठवून द्यावे.

आपण सर्वजण महंतच आहात. आपल्या हातात दासबोध आहे. त्याचा फायदा काय आहे हे अनुभवत आहात. आधी केले मग सांगितले। यानुसार दासबोधाचा प्रसार प्रचार करू या. सध्या ही फार मोठी सामाजिक गरज आहे. दासबोधाची ताकद फार मोठी आहे. त्यामुळे तसा प्रयत्न करू या! रामकथा ब्रह्मान्ड भेदून पैल्याड न्यावी।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

स्वाध्याय ६ समास १५-२ - निस्पृह व्याप

एक सुंदर समास. हा समास वाचताना श्रीसमर्थ कसे आहेत हे लक्षात येते. ओवी १२ पासून वाचले तर ते कसे आहेत याचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते.
श्रीसमर्थानी १२ वर्षे देशाटन केले. त्यावेळी त्यांनी देशातील परिस्थितीचे अवलोकन केले व त्याचे वर्णन ओवी १ ते ११ मध्ये आहे.
या जगात अनेक प्रकारची माणसे आहेत. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व हे भिन्न भिन्न आहे, स्वभाव वेगळे आहेत, रहाणीमान वेगळे आहे. प्रत्येकाचा उद्योग वेगळा आहे. ओवी ५ व ६ मध्ये त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य आहे. कित्येक लोक मुसलमान झाले, कित्येक जण युद्धात मारले गेले. तसेच भाषेच्या भेदाने कितीजण एकमेकांपासून दुरावले आहेत ( आत्ता सुद्धा असेच आहे. मी मराठी, हा गुजराथी, हा मद्रासी असा भेद होत आहे पण आम्ही सर्व भारतीय आहोत हे दिसत नाही. आपण भाषेतच अडकलो आहोत. त्यामुळे समाजात अंतर तयार होते, भाषेमुळे मतभेदाची भिंत उभी राहते. परिणामी एकमेकांचा राग केला जातो, माणूस माणसापासून दूर जात आहे. मतांच्या राजकारणासाठी असले उद्योग केले जातात ) श्रीसमर्थ सांगतात थोडे फार महाराष्ट्रात चैतन्य उरले आहे. त्यामुळे तेथे राजकारण करण्यास वाव आहे.

राजकारणे लोक रुधीला। राजकारण म्हणजे समाजातील भिन्न भिन्न विचारांच्या,भिन्न भिन्न गुणांच्या, भिन्न भिन्न ताकदीच्या सर्व लोकांना एकत्र आणायचे. ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे कार्य हाती द्यायचे. मग सर्वांच्या मदतीने समाजाची उन्नती घडवून आणायची. हे काम श्री समर्थांचे महंत करत.

कित्येक जण युद्धात गुंतले आहेत, सतत त्यावरच चर्चा असते ( काश्मीर मध्ये काय चालू आहे? ) जे व्यापार करत आहेत, ते त्यातच गुंतलेले आहेत. समाजाचा विचार करण्यास कोणालाच फुरसत नाहीये.

आता पारमार्थिक प्रांतात, भक्ती मार्गात काय सुरू आहे याचे वर्णन श्रीसमर्थ करतात.
शडदर्शने नाना मते।
षडदर्शने - धर्म किंवा तत्वज्ञान या संबंधीचे सहा पंथ आहेत -- सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ( याशिवाय बौद्ध, जैन यांची मते, त्यांचे दर्शनग्रंथ वेगळे आहेत) यानुसार प्रत्येकजण निरनिराळी मते मांडतो, त्यामुळे अधिक गुंतागुंत होते. तसेच स्मार्त आणि वैष्णव हे पंथ आहेतच. स्मार्त म्हणजे शैव. वैष्णव म्हणजे विष्णूची उपासना करणारे ( आडवे गंध, उभे गंध ) असे भेद आहेतच. प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठ मानतो. लोकांना आपल्याकडे खेचायला बघतो व स्वतःच्या पंथाचा विस्तार करायला पहातो. त्यामुळे फारच गुंतागुंत झाली आहे. योग्य काय अयोग्य काय याचा कोणीच विचार करत नाही. आपली इच्छा, कामना जेथे पूर्ण होईल असे वाटते तेथे माणूस धावत आहे. सकाम भक्ती वाढत आहे. एकमेकांचा द्वेष करणे सुरू आहे. हे चित्र आज पण आपण बघत आहोत. ३५० वर्षे होऊन गेली तरी समाज तसाच वागत आहे, एकमेकांना नावे ठेवणे, स्वतःचा पंथ/ संप्रदाय श्रेष्ठ मानणे, दुसऱ्या च्या उपासना पद्धतीस नावे ठेवणे हे आजही सुरू आहे. परंतु यामुळे खरे ज्ञान कोणाला समजतच नाही. ईश्वराचे स्वरूप कोणाला समजत नाही फक्त मतामतांचा गलबलाच दिसतो.

परंतु यामध्येही एखादा विचारवंत असतो. तो लोकांना मार्ग दाखवतो. त्याच्यापाशी अनुभवांचे ज्ञान असते. तो चतुर, बुद्धिमान आणि तारतम्य जाणणारा असल्याने सर्वाना पसंत पडतो. तो एकही क्षण वाया घालवत नाही. अशा महंतांचे वर्णन ओवी १५ पासून आहे.

या महंतांचे पाठांतर खूप असते. तो उत्तम विषय मांडतो. आपल्या ज्ञानाच्या बळावर सर्वांना शांत करतो, त्यांच्या मनातील घालमेल शांत करतो. त्यामुळे त्याच्या निरुपणाची आवड सर्वाना लागते. मते मतांतरे असतील तर आपल्या अनुभवाच्या जोरावर स्वतःचे म्हणणे मुद्देसूद मांडतो व शंका निरसन करतो. त्यामुळे लोकांमध्ये तो आवडता होतो, समाजाचे लक्ष वेधून घेतो. परंतु तो या प्रसिद्धीमध्ये अडकत नाही. प्रसंग पाहून कार्य करतो आणि ते झाले की उदासवृत्तीने तेथून निघून जातो.

अशा वर्तनाने लोकांना त्याची ओढ लागते. कारण इतका निःस्पृह तसेच ज्ञानी, विरक्त माणूस पाहिलेला नसतो. लोक त्याला शरण जातात, पण तरीसुद्धा तो तेथे थांबत नाही, गुंतत नाही. त्याला शोधायला गेले तर तो कोठे सापडत नाही. चटकन ओळखु येत नाही. कारण त्याचा वेष अत्यंत साधा असतो. बडेजाव कोठेही नसतो. तो जेथे उपदेश करतो तेथील लोकांत त्याच्या बोलण्यामुळे कोणताही गोंधळ उडत नाही, सर्व गोष्टींबद्धल स्पष्टता येते. सर्व लोकांना भजनांस लावून तो तेथून निघून जातो.

खनाळामधे जाऊन राहे। खनाळ म्हणजे घळ. त्या घळीत तो महंत रहातो. कारण त्याला एकांत हवा असतो. साधना त्याच्यासाठी महत्वाची आहे. सर्वांना शिवथर घळ माहीत आहेच. अशा अनेक घळी आहेत ज्यात श्रीसमर्थ रहात. सज्जनगडावर सुध्दा घळ आहे. दास डोंगरी रहातो। यात्रा देवाची पहातो। श्रीसमर्थ तेथे रहात असले तर समाजाची काळजी तेथे करत. लोकांत जाऊन काय कार्य करायचे यावर तेथे चिंतन करत. श्रीसमर्थांचा महंत हा असा आहे. काही गलबला काही निवळ।ऐसा कंठीत जावा काळ। असे त्यांचे वागणे आहे.

अशा अवघड ठिकाणी महंत राहीला तरी लोक त्याला शोधत येतात. असा हा महंत आहे. लोक समुदाय करून तो लोकांना राजकारण करण्यास शिकवतो. समूहाने समूह वाढतो व संघटना तयार होते. महंत हे कार्य करत होता. पण गुप्तपणे तो कार्य करत असे, आपण पडद्यामागून सूत्र हलवणे म्हणतो तसे! त्याच्या अशा वर्तनामुळे अनेक शिष्य समूह निर्माण होतात. असा कार्यामुळे समाजात परमार्थ बुद्धी दूरवर पसरते. अशामुळे उपासनेचा गजर सर्वत्र ऐकू येतो. त्यामुळे अनेक लोक मुक्त होतात. लोकांना आपलेसे करण्याच्या अनेक युक्त्या त्याच्यापाशी असतात. त्याचा वापर करून तो लोकांना आपलेसे करून घेतो. जन्माला आल्यावर अशी कीर्ती संपादावी. आपले आयुष्य समाजासाठी झिजवावे आणि अनेक लोकांना सुखी करावे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।