आता दुसऱ्या वर्षाचा अभ्यास सुरू करू या. नव्या जोमाने व उत्साहाने! आता सुद्धा दर महिन्याला एकच स्वाध्याय सोडवायचा आहे, तसेच त्याच समीक्षकांकडे स्वाध्याय पाठवायचे आहेत.
चला मग सुरू करू या .....

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

या समासाचे नाव देहदुर्लभ निरूपण. म्हणजे मनुष्य देह दुर्लभ आहे त्याविषयी विवरण! मग असे काय आहे देहात की ज्यामुळे या देहाला दुर्लभ म्हटले आहे? यासाठी आधी मनुष्य देहाचे वैशिष्टय पहायला हवे. या देहाने काय काय करू शकतो, त्याचे वैशिष्टय काय हे पहावे लागेल. ओवी १ ते २५ मध्ये देहाच्या साहाय्याने आपण काय काय करू शकतो हे सुरवातीस सांगितले आहे. देहाच्या साहाय्याने आपण सगुणाची पूजा करतो. गणेशपूजन, शारदा पूजन,सद्गुरू पूजन वगैरे. काव्य,अभ्यास,विविध विद्या आत्मसात करण्यासाठी देहच हवा. ग्रंथलेखन, वाचन, श्रवण, मनन, उपासना, कर्म, तीर्थाटन, ध्यानधारणा, तपस्या सर्व काही देहाच्या साहाय्याने होते, देहाचा आधार घेऊनच आपण कोणतेही कार्य करू शकतो.

८ व्या ओवीत इहलोक आणि परलोक असे दोन शब्द आले आहेत. इहलोक म्हणजे आपण रहातो ते जग आणि परलोक म्हणजे ईश्वराचे जग (स्वर्ग नव्हे)
परलोक म्हणजे स्वस्वरूपात विलीन होणे/जाणे/मनुष्य जन्माचे सार्थक. याला परलोक म्हणण्याचे कारण असे की " पर " म्हणजे परका, मला जे माहीत नाही ते, माझे जे अज्ञान आहे ते! माझे स्वस्वरूप हे सूक्ष्म आहे, ते मला दिसत नाही, जाणवत नाही. पण ते आहे. माझा प्रपंच व्यवस्थित होणे,तो करताना सर्वप्रकारची कर्तव्ये, जबाबदाऱ्या कशातही न गुंतता पार पाडणे म्हणजे इहलोकतील सार्थक. हे पार पाडत असताना प्रपंचातील फोलपणा समजतो. त्यामुळे पारमार्थिक वाटचाल सुरू होते. करता करता एक जन्म असा येतो की माझे स्वस्वरूप उमगते. हे झाले परलोकातील सार्थक. मनुष्य सोडून इतरांना आहार निद्रा, भय आणि मैथुन या चारच भावना असतात, ते सर्वजण आयुष्यभर याच चौकटीत जगत असतात.पण मनुष्यास या चार गोष्टींव्यतिरिक्त प्रगत मेंदू दिला आहे. विचार स्वातंत्र्य दिले आहे, त्या सहाय्यानेच परलोकातील सार्थक करू शकतो.

या देहाच्या सहाय्यानेच स्वैराचार करता येतो,विषय भोगता येतात,वाईट वागता येते, पुण्य कर्म करता येते, पापकर्म करता येते.
नऊ प्रकारे भक्ती करता येते -- श्रवण,कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन दास्य, सख्य, आत्मनिवेदन अशा नऊ भक्ती या देहाच्या साहाय्याने करता येतात. चार मुक्ती - सलोकता, समिपता,सरूपता आणि सायोज्यता या देहाच्या साहाय्याने मिळवता येतात (पहा दशक ४ समास १० - मुक्ती चतुष्टय)
देहाच्या साहाय्याने आत्मनिवेदन (ओवी १७) प्राप्त होते. आत्मनिवेदन म्हणजे मी आणि ईश्वर एकच आहोत, मी म्हणजेच ईश्वर याची अनुभूती. ही अनुभूती म्हणजेच मोक्ष.
सगुणकडून निर्गुणाकडे वाटचाल कशी वाटचाल होते याची झलक ओवी २१ पासून सुरवात होते. आत्म्याची संकल्पना येथे येते. संपूर्ण जगात,विश्वात, चराचर सृष्टीत भरून आहे तो ईश्वर म्हणजेच ब्रह्म म्हणजेच परब्रह्म म्हणजेच थोरला देव. त्याचे आपल्या शरीरातील लहान स्वरूप म्हणजे आत्मा. फुग्यात हवा आहे आणि फुग्याबाहेरही आहे. मध्ये फक्त रबराचे पातळ आवरण असते. आवरण फाटते त्यावेळी फुगा फुटला असे म्हणतो व आतील हवा बाहेरील हवेत मिसळली जाते. त्यानुसार परब्रह्म आणि आत्मा यामध्ये देह/शरीर हे आवरण आहे. ते दूर झाले की आत्मा आणि ईश्वर एकच होतात. म्हणजे मी आणि ईश्वर एकच होतो, मी स्वस्वरूपाकार होतो

माझे शरीर आत्मा चालवतो म्हणजे माझ्या शरीराचे इंधन आत्मा आहे. तो पडल्यामुळे शरीर कार्य करते. वीज आणि घरातील उपकरणे कसे कार्य करतात हे पाहिले की दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत हे लक्षात येते, तदनुसार शरीर आणि आत्मा एकमेकांवर अवलंबून आहेत, शरीर हे आत्म्याचे घर आहे. आत्मा असेल तर शरीर आहे आणि शरीर आहे तर आत्मा आहे .
पण इथे एक गंमत आहे, आत्मा काहीच करत नाही, तो फक्त ऊर्जा देण्याचे काम करतो. सर्व निर्णय मन घेते. मन हे सूक्ष्म देहाचा भाग आहे. (पहा दशक १७ समास ९)
सर्व सृष्टी अष्टधा प्रकृती पासून बनली आहे, म्हणजे त्रिगुण+पंचमहाभूते. हरी संकल्प म्हणजे ईश्वरास अनेक व्हावेसे वाटले. त्यावेळी त्याच्यापासून मूळमाया, पुढे गुणमाया, पुढे त्रिगुण व पंचमहाभूते तयार झाली . त्यापासून ८४ लक्ष योनी तयार झाल्या. त्यातील सर्वात प्रगत म्हणजे मनुष्य योनी. सर्वार्थाने श्रेष्ठ. म्हणून दुल्लभ.
ज्यानुसार बी मध्ये सूक्ष्म रूपाने झाडाचे अवयव असतात त्यानुसार शरीरात ईश्वराचा अंश असतो. हा देह पंचमहाभूतांचा आहे. पंचमहाभूते गुणमायेपासून, गुणमाया मुळमायेपासून आणि मूळमाया ईश्वरापासून तयार झाली, म्हणजे नीट विचार केला की समजते की माझ्यात ईश्वर आहे.

देहामुळे आत्मा जगतो आणि आत्म्यामुळे देह! मी जे जे काही करतो ते आत्मा अलिप्तपणे पहात असतो, तो मध्ये लुडबुड करत नाही. पण साक्षीदार मात्र आहे. तो प्रत्येक शरीरात आहे, प्राणी, पक्षी, वनस्पती सर्व ठिकाणी आहे. म्हणून कोणाचे मन दुखवू नये. पण तो सर्व ठिकाणी भरून आहे याची जाणीव फक्त मनुष्यच करू शकतो. मी कोण आहे याची जाणीव फक्त मनुष्यालाच आहे. इतरांना नाही. म्हणून ज्याला स्वस्वरूपाची जाणीव आहे तेथेच विनम्र व्हावे, नतमस्तक व्हावे, अन्य ठिकाणी होऊ नये. परंतु कोणाला दुखवू ही नये मग ते कोणीही असेल, प्राणी अथवा मनुष्य.

अशा गोष्टी जाणून घ्यायचा असतील तर अध्यात्म ग्रंथ वाचावेत, अभ्यास करावा, चिंतन मनन करावे व स्वस्वरूप जाणून अनुभवावे. हे सर्व देहाच्या साहाय्याने करू शकतो. हे त्याचे वैशिष्टय आहे, इतर योनीत ते शक्य नाही, म्हणून मनुष्य देह दुर्लभ आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।