जाणपण म्हणजे ज्ञान. या समासाचा विचार केला असता असे आढळते की श्रीसमर्थांनी या समासाचे दोन भाग केले आहेत, एक सामान्य जीवनातील जाणपण म्हणजे ज्ञान आणि दुसरा भाग पारमार्थिक जाणपण.

रोजच्या जीवनात जो ज्ञानी आहे, हुशार आहे, शिकलेला आहे त्याला समाजात मान असतो. जो अशिक्षित आहे त्याला समाज किंमत देत नाही त्यामुळे त्याचे आयुष्य खडतर जाते. फार कष्ट उपसावे लागतात. या सर्वांचे वर्णन ओवी १ ते १८ पर्यंत आहे. प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही प्रांतात श्रीसमर्थ कसे मार्गदर्शन करतात हे या समासात पाहण्यास मिळते.

त्याच्यापाशी उत्तम गुण आहेत ते कसे उत्तम आयुष्य जगतात आणि ज्यांच्यापाशी गुणच नाहीत त्यांची अवस्था काय असते याचे यतार्थवर्णन ओवी ४ ते १८ पर्यंत आढळते. ही विद्या कोणतीही असो पण त्यात अतिशय कुशल असणे गरजेचे आहे. अगदी कोणतेही -- सुतारकाम, शिलाईकाम, रंगकाम, मेकॅनिक, इलेक्टरीशीअन वगैरे वगैरे. पण तज्ञा हवा, त्या कामात हातखंडा हवा. जे बैद्धीक पातळीवर खूप हुशार आहेत त्यांना आपले ज्ञान कुठे , कसे आणि कधी वापरायचे हे समजले पाहिजे. संधीचे सोने कसे करायचे हे समजले पाहिजे.
जैसी विद्या तैसी हाव ।
जैसा व्याप तितके वैभव ।
तोलासारीखा हावभाव ।
लोक करिती ।। १३ ।।

व्याप तितका संताप हे श्रीसमर्थांना मान्य नाही. ते व्यापाला वैभव म्हणतात. मनुष्याने उंच भरारी मारावी, कर्तृत्वाने मोठे व्हावे हे श्रीसमर्थ सांगतात. कर्तबगार बनावे. असे वागले तर समाजात किंमत मिळते. उत्कट भव्य तेचि घ्यावे । मिळीमिळीत अवघे टाकोनी द्यावे । हे श्रीसमर्थ सांगतात.

हा उपदेश तरुण वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे. स्वप्ने पहावीत आणि मग ती पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गाने, योग्य प्रकारे वाटचाल करावी. उदंड विद्या शिकवी. त्याचा उपयोग समाजासाठी करावा मग आपली किंमत आपोआप वाढते.
प्रपंच अथवा परमार्थ ।
जाणता तोचि समर्थ ।
नेणता जाणिजे व्यर्थ ।
निःकारण ।। १९ ।।

प्रपंच आणि परमार्थात जाणत्याला खूप महत्व आहे. प्रपंचातील जाणता म्हणजे प्रपंचातील गोष्टीचे ज्ञान आणि भान. परमार्थातील जाणता म्हणजे आत्मज्ञानी माणूस! प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती घेतलेला म्हणजेच स्वस्वरूप अनुभवलेला. ज्यांना स्वस्वरूप माहीत नाही त्यांची परमार्थात किंमत शून्य असते.

प्रपंच आणि परमार्थ या दोन समांतर रेषा आहेत. पण नुसता प्रपंच करत बसायचे नाही ते परमार्थात प्रपंच करत प्रगती करायची आहे. परमार्थ करण्यासाठी प्रपंच पूरक आहे. प्रपंच हा न करता होतो पण परमार्थ करावा लागतो. हे ज्याला समजले तो कधी प्रपंचात अडकत नाही. फसत नाही. आई स्वहित कशात आहे हे समजले पाहिजे. जर ते समजले नाही तर जन्म मरणाच्या फेऱ्यात मनुष्य अडकतो. यातून सुटका करून घेण्यासाठी शुद्ध ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. माया - ब्रह्म, जीव- शिव, सार- असार भाव- अभाव ओळखावे. तरच जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते ( ओवी २३, २४ )

ओवी २६ मुक्ती म्हणजे काय हे सांगते. आधी देव कसा आहे हे ओळखावे. नंतर मी कोण आहे हे जाणून घ्यावे. ते जाणल्यावर समजते की मी आणि ईश्वर एकच आहोत. हे ज्यावेळी समजते त्यावेळी मुक्ती मिळते.

जो स्वस्वरूप जाणतो तो सर्वांतून मुक्त होतो. परंतु हे जाणताना दृश्य जगत असत्य आहे हे समजले पाहिजे, त्यात गुंतून उपयोगी नाही. अन्यथा मोक्ष मिळणार नाही.
जाणणे म्हणजे स्मरण ।
नेणणे म्हणिजे विस्मरण ।
दोन्हीकडे कोण प्रमाण ।
शहाणे जाणती ।। ४० ।।

ही ओवी महत्वाची आहे. स्वस्वरूपचा स्मरण सतत असावे अन्यथा ते अज्ञान होईल. जो हे स्मरण ठेवतो तोच खरा ज्ञानी आणि भाग्यवान!
ब्रह्माडी तेचि पिंडी असे । आपले शरीर म्हणजे पिंड. आपण सोडून जे असते ते ब्रह्मान्ड. तेथे असणारा ईश्वर हाच आपल्यात पण आहे. याचा प्रत्यय घेतला पाहिजे. जे जाणत नाहीत त्यांची अवस्था फार सुंदरपणे वर्णन केली आहे. मग पिंडी ते ब्रह्माडी याचा अनुभव घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.