दशक ४-५ --- पादसेवनभक्ती
नवविधा भक्ती मधील चौथी भक्ती. या समासात दुसऱ्या ओवीत या भक्तीची व्याख्या आणि या भक्तीची परिणीती सांगितली आहे ---
पादसेवन तेचि जाणावे।
कायावाचमनोभावें।
सद्गुरूंचे पाय सेवावे।
सदगतिकारणे।। २ ।।
या ओवीचा अर्थ असा की सद्गुरूंचरणी संपूर्ण शरणागती हवी. व्यावहारिक भाषेत आपण म्हणतो "त्याने पाय पकडले" म्हणजे शरण आला. तसे सद्गुरूंचे पाय धरायचे, शरण जायचे, कशासाठी? तर सदगतिकारणे! सदगति म्हणजे स्वस्वरूप ओळखणे, अहं ब्रह्मास्मि। ची अनुभूती घेणे. ही अनुभूती सद्गुरूंशिवाय येऊच शकत नाही. तेच आपला मार्ग प्रशस्त करतात.
सद्गुरुचराणी अनन्यपण हवे. ते असेल तरच त्यांची आपल्यावर कृपा होते, मग आपल्याला स्वस्वरूप समजून जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो ( ओवी ४ )
सद्गुरू सदवस्तू दाखवतात. सदवस्तू म्हणजे ईश्वर, परब्रह्म. त्याला या ठिकाणी वस्तू असे संबोधले आहे.
ओवी ६ मध्ये संगत्याग हा शब्द आला आहे. संग म्हणजे बरोबर असणारा, सोबत असणारा, आपला सोबती. आपला मीपणा,अहंकार, षड्रिपु, नातेवाईक, घरदार, सामाजिक प्रतिष्ठा/ओळख, देहभाव, देहबुद्धी हे सर्वकाही " संग " या गोष्टीत येते. त्याचा त्याग करायचा आहे, हे सर्व सोडायचे आहे. ते सोडल्याशिवाय ती वस्तू म्हणजेच आपले स्वस्वरूप समजणारच नाही. आपण त्यात गुंतलेले आहोत, ते सोडायला मागत नाही मग स्वस्वरूप कसे byयचे नाही. ( ओवी ६, ७)
आठव्या ओवीत संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपण, सहजस्थिती,उन्मनी, विज्ञान हे सात शब्द सांगितले आहेत. त्यांचा अर्थ लक्षात घेणे गरजेचे आहे. मग पाहू या त्यांचे अर्थ ---
यासर्व गोष्टी पादसेवनामुळे समजतात. सद्गुरूंना शरण गेल्यामुळे वेदांचा अर्थ,वेदांचे मर्म, वेदांत तत्वज्ञान, शैव, सिद्धांचा मार्ग, सिद्धांच्या स्वानुभवाचे रहस्य, भगवंताच्या मार्गातील विविध अनुभव, शब्दातीत गोष्टी, परमात्मा अशा अनेक गोष्टी समजतात. या सर्व गोष्टी सद्गुरूंपाशी बसून शिकाव्यात, समजून घ्याव्यात.
१३ व्या ओवीत पूर्वपक्ष असा शब्द आला आहे. वेदांतशास्त्रात पूर्वपक्ष आणि सिद्धांत अशी विषय मांडण्याची पद्धती आहे. पूर्वपक्षात स्वस्वरूपाबद्धल आक्षेप घेतला जातो, शंका घेतली जाते. सिद्धांतात त्याचे निरसन केले जाऊन स्वरूपसिद्धी केलेली असते. मग आत्मवस्तू कशी पहावी हे पुढच्या ओवीत सांगतात.
१४ व्या ओवीत त्रिविधा प्रचिती असा शब्द आला आहे. प्रचिती म्हणजे अनुभव. ही तीन प्रकारची -- शास्त्र प्रचिती, गुरू प्रचिती आणि आत्म प्रचिती. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी, सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान आणि शेवटी स्वतःचा अनुभव. स्वतःच्या अनुभवाचा मेळ शास्त्र आणि गुरू प्रचितीशी घालावा.
परमात्म वस्तूशी आपण एकरूप झालो की दृश्य ओसरते. जो पर्यंत दृश्याचे मिथ्यापण ओसरत नाही तो पर्यंत स्वस्वरूप अनुभवता येत नाही. हा अनुभव माणसाच्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असतो.
कितीही साधना केली तरी स्वतःच्या जीवावर परमात्मा साध्य होऊ शकत नाही. कारण साधना अल्प, त्याचा काल अल्प आणि परमात्मा अनंत. अल्पपणा सांभाळून अनंताला गवसणी घालत येत नाही. यश येत नाही. त्यासाठीच सद्गुरू असतात. आपल्यासाठी एक पायरी उतरून त्यांनी जन्म घेतला असतो. ते या ठिकाणी मार्ग दाखवतात व गंतव्य स्थानी घेऊन जातात. हे कार्य तेच करू शकतात. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, त्यांची सेवा करावी. अशी ही चौथी भक्ती आचरली असता सायुज्य मुक्ती मिळते. त्यामुळे भवसागर सद्गुरुंच्या सहाय्याने, आधाराने, मार्गदर्शनाने पार करता येतो.
दशक ४ समास ५ - अर्चनभक्ती
अर्चन म्हणजे पूजा, उपास्य देवतेची पूजा. आपण ती रोजच करतो. फक्त प्रश्न असा की आपण किती मनापासून पूजा करतो? त्यात आर्तता असते का? आनंद असतो का? का नुसतेच उपचार असतात?
श्रीसमर्थ अर्चनभक्तीची व्याख्या दुसऱ्या ओवीत सांगतात. पूजेबद्धल सांगताना शास्त्रात जशी सांगितली आहे तशी पूजा करावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य अशी पंचोपचार पूजा आपण रोज करतो. शास्त्रात पूजेचे १६ उपचार सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे -- आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार, मंत्रपुष्प.
पूजा करताना नुसते उपचार नकोत तर आर्तता हवी. ती कशी हवी ? पूजा करताना मन प्रसन्न हवे, आनंद वाटला पाहिजे. आता मी जो सृष्टीचा पालनकर्ता आहे, सर्व शक्तिमान आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे अशा ईश्वराची पूजा मी सेवा म्हणून करत आहे ही भावना हवी. ईश्वर माझ्यासाठी एवढे करतो तर त्याबद्धल कृतज्ञता भाव हवा, जाणीव हवी. पूजा झाल्यावर माझ्या देवाचे रूप सुंदर दिसायला हवे ही भावना असावी. पूजेसाठी शक्यतो ताजी फुले असावीत, शिळी फुले टाळावीत. ऋतुनुसार देवाच्या आंघोळीसाठी पाणी असावे. त्याची आंघोळ झाल्यावर सुवासिक अत्तर लावावे. देवाच्या पाटावर गुलाबपाणी शिंपडावे. जर देवाची वस्त्रे असतील तर ती रोज बदलावीत. गंध लावताना, हळदकुंकू लावताना ते देवाच्या डोळ्यात जाणार नाही ना? याची काळजी घ्यावी. फुल वाहताना देवाचे तोंड झाकले जाणार नाही याची काळजी घ्यावी. मग छान नैवेद्य दाखवावा, तो देवास खाऊ घालावा, भरवावा. मग निरंजन लावून, उदबत्ती लावून आरती करावी. मग प्रार्थना करून उपचारात काही चूक झाली असेल तर क्षमा मागावी. मनोभावे नमस्कार करावा.
पूजेची वेळ शक्यतो बदलू नये. आवाहनाचे मंत्र येत नसतील तर मनाने देवास आवाहन करावे. पूजेची भांडी चांदीची असावीत ( असल्यास ) चांदीची भांडी पूजेसाठी रोज वापरावीत, ती कपाटात ठेवून देऊ नये. आपल्या देवाचे वैभव आपणच वाढवायचे असते. तांब्याची, पितळ्याची भांडी असतील तर ती घसलेली, चकचकीत असावीत. पूजेआधी सुंदर रांगोळी काढावी.
थोडक्यात मी माझ्यासाठी कसा वागतो अगदी तसेच देवाशी वागावे, देवासाठी करावे. मला स्वच्छ सुंदर कपडे घालायला आवडतात, अत्तर लावायला आवडते, उत्तम पदार्थ सेवन करावेसे वाटतात. मग तसेच ईश्वराशी वागावे. जर मला काही खायला हवे असेल आणि ते जर एका डिशमध्ये सजवून दिले तर खाताना जास्त आनंद होतो, खायची इच्छा होते अन्यथा तो खायचा उपचार ठरतो. त्यानुसार देवास नैवेद्य दाखवताना प्रसाद सजवावा. देवास त्याच आस्वाद घ्यावासा वाटेल. पूजा करताना देवाशी गप्पा माराव्यात. देव सुद्धा बोलतो.
यासर्व गोष्टी म्हणजे अर्चनभक्ती.
घरात चालून आलेले कुलधर्म, कुळाचार करावेत. ते बंद करू नयेत. या गोष्टी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. त्या त्या देवतांची आठवण ठेवल्याने आपल्या घराण्याला त्या देवतेचे आशीर्वाद मिळतात, कृपादृष्टी रहाते. हे करताना वेळ नाही ही सबब सांगू नये.
ओवी ६ ते १३ मध्ये अनेक देवता सांगितल्या आहेत. ओवी १८ व १९ मध्ये पूजेचे उपचार सांगितले आहेत. नंतर देवाचे वैभव कसे वाढवायचे हे सांगितले आहे. या सर्व गोष्टी गोंदवले, सज्जनगड येथे पाहण्यास मिळतात.
अर्चनभक्ती कशी करावी तर काया, वाचा, मन, चित्त, जीवे, प्राणे आणि सदभाव अशा प्रकारे करावी. ( ओवी २९ ) थोडक्यात अनन्यता हवी.
अशीच पूजा आपल्या सद्गुरूंची करावी. कारण ती आपली माऊली असते.
आपला हिंदू धर्म खूप उदार मनाचा आहे. पूजेमध्येसुद्धा त्याने उत्तम गोष्ट सांगितली आहे. ज्यांना पूजा करणे जमत नसेल, उपचाराने पूजा करता येत नसेल तर मानसपूजा करावी. अशी पूजा आपण कुठेही, केव्हाही करू शकतो. या पूजेत जे ऐहिक जीवनात पूजेसाठी जे करता येत नाही, काही आर्थिक मर्यादा येतात त्या सर्व बाबी आपण मानसपूजेत करू शकतो. या पूजेत मन फार महत्वाचे! ही पूजा करताना मन फक्त ईश्वरापाशी असावे. मानसपूजा करताना एकाग्रता महत्वाची!
अर्चन भक्ती आपल्याला सगुणाकडून निर्गुणाकडे घेऊन जाते. अशी ही भक्ती मनापासून करावी.
दशक ४ समास ६ - वंदनभक्ती
वंदन चा सोपा अर्थ नमस्कार करणे. नमस्कार करणे हे चरणी लीन होण्याचे चिन्ह आहे. देहाचा अभिमान मारण्यासाठी परमार्थाची सगळी साधने करायची असतात. नम्रता अंगी आली तरच लीनता येते. म्हणून साधुसंत, भगवंत याना मनापासून नमस्कार करावा.
श्रीसमर्थ कोणाला कसा नमस्कार करावा हे स्पष्टपणे चौथ्या ओवीत सांगतात --
साष्टांग नमस्कारास अधिकारू।
नानाप्रतिमा देव गुरू।
अन्यत्र नमनाचा विचारू।
अधिकारे करावा।।
साष्टांग नमस्कारामध्ये आठ अंगे येतात. ती अंगे म्हणजे डोके, छाती, डोळे, मन, तोंड, हात, पाय, गुडघे. म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक असा हा नमस्कार आहे. कायिक मध्ये हात, पाय आणि गुडघे येतात. वाचिक मध्ये तोंड येते आणि मानसिक मध्ये मन येते. म्हणजे या नमस्कारात तिन्ही अंगांनी शरण जातो. दुसरा अर्थ असा की षड्रिपु, मन आणि बुद्धी या आठ अंगांसह ईश्वराला शरण जाणे. त्यामुळे असा नमस्कार फक्त साधुसंत आणि ईश्वरालाच घातला जातो. अन्यत्र नमनाचा विचारू। अधिकारे करावा।। म्हणजे प्रत्येकाला नमस्कार करण्याची पद्धत निराळी आहे. आजकाल फक्त एका हाताने वाकून नमस्कार करतात. हे अतिशय अयोग्य आहे, नमस्कार दोन हातांनी करावा.
मग नमस्कार कोणाला करावेत याची यादी श्रीसमर्थ देतात. हे सांगताना कोणत्याही देवाला नमस्कार केला की तो ईश्वराला पोहोचतो असे सांगतात. ईश्वर म्हणजे जगतनियंता. ओवी १४ पासून २१ पर्यंत नमस्काराचे फायदे कथन केले आहेत. २० व्या ओवीत अक्षम्य अपराध करून आलेल्या माणसास श्रेष्ठ लोकांनी क्षमा करावी असे श्रीसमर्थ सांगतात. कारण या ठिकाणी पश्चात्ताप आहे. नुसतीच लीनता नाही. गुन्हा केल्याची जाणीव आहे आणि त्याबरोबर सम्पूर्ण शरणागती आहे. वाल्या कोळ्याने एवढे अपराध केले तरी नारदमुनीनी क्षमा केलीच ना! अशी उदाहरणे गोंदवलेकर महाराज आणि श्रीसमर्थ यांच्या बाबतीत सुद्धा पाहण्यास मिळतात. संत मंडळींना समोरील व्यक्तीचा भाव लगेचच समजतो. अशा अपराधी व्यक्तीस जवळ करून त्याच्याकडून भरपूर साधना करून घेतात. त्यामुळे त्याचे संचित जळून जाते. कारण सद्गुरूंची कृपा आहे म्हणून! मग अशा लोकांसाठी आपले सद्गुरू असे करतात तर आपण अशी शरणागती पत्करली तर? आपल्या आयुष्याचे सार्थक होईल. तसा आपण प्रयत्न केला पाहिजे. असा नमस्कार करायला दुसरे काहीही लागत नाही, लागते फक्त अनन्यता. ती आणण्याचा प्रयत्न करावा.
साधक भावे नमस्कार घाली।
त्याची चिंता साधुस लागली।
सुगम पंथे नेऊन घाली।
जेथील तेथे।। २४ ।।
किती सुंदर ओवी आहे ही! आपण एवढे अनन्य व्हायला शिकले पाहिजे. एकदा तरी सद्गुरूंना आर्ततेने हाक मारावी. शरण जावे. ती माऊली आहे, नक्कीच प्रतिसाद देईल. पण हे करायला हवे. ज्यावेळी हे जमेल त्यावेळी वंदनभक्ती फळास आली असे म्हणता येईल.