या आधी आपण सत्व,रज आणि तम या तीन गुणांचा अभ्यास केला. हे तिन्ही गुण आपल्यात असतात. सत्वगुण म्हणजे काय, कोणाला सत्वगुण म्हणायचे हे आपण अभ्यासले. आता सत्वगुणी असलेल्या माणसात असलेल्या गुणांच्या जोड्या या समासात दिल्या आहेत.

हा समास सांगताना श्रीसमर्थ सांगतात की हे गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न करावा. गंमत अशी की यातील काही गुण असणारी माणसे आपल्या आजूबाजूला आपण पाहतो परंतु त्याची जोडी ( या समासात सांगितलेली ) आपल्याला सापडत नाही, ती जोडी रता व्यक्तीत नसते. थोडक्यात तो माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. परंतु हा समास वाचला की असे लक्षात येते की अशा गोष्टी, श्रीसमर्थ, हनुमंत, प्रभुरामचंद्र यांच्यामध्ये हे सर्व गुण होते.

मग प्रश्न असा पडतो की अन्य माणसात हे गुण जा आढळत नाहीत? आपला देह हा अष्टधा प्रकृतीने ( पंचमहाभूते आणि तीन गुण) यांनी बनला आहे. सामान्य माणसात तमोगुण आणि रजोगुण यांचे प्राबल्य असते. त्यामुळे दोन चांगले गुण एकत्र दिसत नाहीत. तमोगुणामुळे कुविद्या वाढीस लागते. रजोगुणामुळे अहंकार वाढतो. हा अहंकार वाढल्यामुळे कुविद्या वाढते. परिणामी एखादा गुण असला तरी त्यामुळे माणूस गर्विष्ठ होतो. चटकन उदाहरण घ्यायचे तर सुंदर दुसणारी व्यक्ती ही गर्विष्ठ असते, तिला सौंदर्याचा अभिमान असतो. ज्ञानी माणसास ज्ञानाचा गर्व असतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणून या समासात दिलेल्या जोडयाना महत्व आहे. ही सद्विद्या वाढवायची म्हणजे सत्वगुण वाढवायचा. तो वाढला की कुविद्या कमी होते व उत्तम गुण वाढीस लागतात.

यावर विचार करण्यासाठी पुढील जोड्या पाहू -- सुंदर मनुष्य चतुर असेलच असे नाही, राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमस्त, निराभिमानी कार्यकर्ता, गायक असून भक्त, नीतीवंत सद्गुणी असून मंत्री. असे फार क्वचित आढळते. जेथे आढळते तेथे समाजाचा उद्धार होतो. या जोड्या ओवी ३ ते १० मध्ये सांगितल्या आहेत.

अशा पुरुषांमध्ये कोणते गुण असतात याचे विवेचन ओवी ११ ते १५ मध्ये आहे. त्याचे वागणे, बोलणे, तो साधन कसे करतो याचे वर्णन १६ ते २४ मध्ये आहे.
ओवी २४ मध्ये सिद्ध असोनि साधक। साधन रक्षी।। असे सांगितले आहे. ही गोष्ट फारच महत्वाची आहे. सिद्ध म्हणजे आत्मज्ञान झालेला. त्याला आत्मज्ञान झाले तरी त्याने साधना ही सुरूच ठेवायची असते. ही तुर्यावस्था आहे. पण उन्मनी नाही. त्याला जाणीव आहे तो कोण आहे पण अजून तो मुक्त नाही. त्यामुळे साधन सुरू ठेवणे गरजेचे आहे.

मग अशा पुरुषाची आदर्श लक्षणे ओवी २५ ते २९ पर्यंत सांगितली आहे.
या समासात आपण या आधी पहिल्या वर्षी अभ्यासलेली एक ओवी पुन्हा इथे सांगितली आहे --
रूप लावण्य अभ्यासिता न ये।
सहज गुणासी न चले उपाये।
काही तरी धरावी सोये।
आगंतुक गुणाची।। ३१

या समासात सांगितलेले गुण स्वतःत जन्मजात असतात. ते जात नाहीत, प्रयत्न करून जात नाहीत. पण नसलेल्या गुणांची संपदा आपण प्रयत्नपूर्वक आपलीशी केली तर त्यामुळे प्राप्त होणारे सौंदर्य, पावित्र्य वेगळेपण देऊन जाईल. अशा व्यक्ती स्वतः प्रसन्नचित्त असतातच. सद्विद्या विरक्त महंताला शोभून दिसते. ज्या विरक्तीसाठी ही सद्विद्या आवश्यक आहे, त्या विरक्ताची लक्षणे, वर्णन दशक २-९ मध्ये आहेत. आता तो समास पाहू.

एक गृहपाठ --- या आधी रूप लावण्य अभ्यासिता न ये। ..... ही ओवी कोणत्या समासात होती व ती ओवी कोणत्या संदर्भासाठी आली आहे? प्रयत्न करा, विचार करा. नाही समजले तर मी सांगीन. पण आधी तुम्ही चिंतन करा.

आता पुढचा समास - दशक २ समास ९ - विरक्त लक्षण

दृश्य विश्वाला सत्य मानणे म्हणजे अविद्या. म्हणजे प्रपंचाला खरे मानणे म्हणजे अविद्या. विद्या म्हणजे परमार्थ. परमार्थ साधायचा असेल ते अविद्येतून बाहेर पडणे गरजेचे आहे. तसे केले की दृश्य जगातून मन बाजूला होते, मग असे बाजूला झालेले मन भगवंताकडे वळवणे सोपे जाते. भगवंताकडे प्रेम वळवणे हा झाला भक्तिमार्ग व दृश्याचे खोटेपण पटणे हा झाला ज्ञानमार्ग. दोन्ही मार्गामध्ये म्ब दृश्याच्या कचाट्यातून बाहेर पडते. मनाच्या या अवस्थेला वैराग्य असे म्हणतात. वैराग्यसंपन्न झाल्यावाचून परमार्थ साधत नाही. देहबुद्धीच्या माणसाने आधी नीतिमान बनणे आवश्यक आहे. त्यामध्ये इंद्रियांना आवर घालण्याची सवय होते. म्हणून श्रीसमर्थांनी उत्तम लक्षणे, सत्वगुण लक्षणे सांगितली. या सर्वांचे पर्यवसान वैराग्याचा उदय होण्यात व्हावे हे परमार्थाला योग्य असते. म्हणून वैराग्याची लक्षणे सांगितली.

माणसाच्या अंगी वैराग्य बाणले म्हणजे त्यास कोणकोणत्या गोष्टी साधतात हे ओवी २ ते ६ मध्ये सांगितले आहे.
वैराग्यामुळे स्वस्वरूपाचे अनुभव येतो. कधीही क्षय न होणारा आनंद प्राप्त होतो, मोक्षलक्ष्मी मिळते. तिच्यामुळे आयुष्य उजळून निघते ( ओवी ४ )
श्रीसमर्थांचा विरक्त हा स्वतः मोठा ब्रह्मज्ञानी असून तो मोठा महंत आहे. त्याने समाजात कसे वागावे याचे वर्णन ओवी ७ पासून ओवी २९ पर्यंत आहे. हा विरक्त लोकसंग्रहकर्ता असल्यामुळे त्याच्याकडे अनेक जण येतात. त्यांच्याशी कसे वर्तन करावे हे या ओव्यांमध्ये आहे. लोकांना एकत्र करून मोठा उत्सव करावा, भजन कीर्तन करावे, उपासना करावी. प्रवचने,निरूपण धडाक्यात करावे. जेणे करून सर्व समाज परमार्थकडे वळेल. विरक्ताने स्नानसंध्या,नित्यनेम, उपासना सोडू नये. संसार सुखाचा करावा। विरक्ताने संसाराचा त्याग करायचा नाहीये, स्वतःवर असलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पडायच्या आहेत. पण कशा तर involvement without attachment. विरक्ताने समाजासाठी झिजावे. परोपकार करावा, लोकांना सन्मार्गाला लावावे. उपाधी मिळाली तर स्वीकारावी पण त्यात अडकू नये. प्रसंगावधान असावे. अभ्यासू असावे. बहुश्रुत असावे. एकाजागी थांबू नये. समाजात वावरावे, फिरावे, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात.

विदेह स्थिती सहज स्थिती। अशी ओवी ३२ आहे. विदेह स्थिती म्हणजे देहात असणे परंतु अखंड अनुसंधान ईश्वराचे असते. सहज स्थिती - मी ब्रह्मस्वरूप आहे ही स्थिती म्हणजे सहज स्थिती. माझ्यात अंतरात्मा आहे, हे शरीर त्याचे घर आहे, ते पडले की मी आणि विश्वत्मा एकच होतो. उदास स्थिती म्हणजे आसक्ती नसणे.
प्रवृत्ती मार्ग म्हणजे जीवाची स्थिती,अवस्था. जगण्याचा मार्ग.
विरक्ताने मुमुक्षुना मार्ग दाखवावा. बद्ध लोकांना त्या अवस्थेतून बाहेर काढावे.
अशी अनेक लक्षणे येथे सांगितली आहेत. ती जाणून घ्यावीत, स्वतःत कशी बाणता येतील यावर विचार करावा. काय चांगले हे कळले . ते जर अंगिकारले नाही तर त्याला पढत मूर्ख म्हणतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।