सृष्टी कशी निर्माण झाली हे आधी पाहू - आधी एकटे ब्रह्म- मग एकोहं बहुस्यां हा संकल्प -- मूळमाया -- माया गुणक्षोभिणी झाली -- त्रिगुण आणि पंचमहाभूते --- पंचिकरण --- ८४ लक्ष योनी. ( क्रम थोडक्यात सांगितला) आता जी सृष्टी दिसते ती अष्टधा प्रकृती पासून तयार झाली म्हणजे त्रिगुण आणि पंचमहाभूते. म्हणजे प्रत्येक जीवात त्रिगुण आहेत - तम, रज आणि सत्व. आधी सुरवातीला रजोगुण कसा असतो, रजोगुणी माणूस कशा स्वभावाचा असतो हे अभ्यासू या.

दशक २-५ -- रजोगुण
या समासाच्या सुरवातीला प्रत्येक देह त्रिगुणाचा असून कोणत्या गुणामुळे काय होते याचा खुलासा केला आहे. सत्वगुणामुळे भगवतभक्ती, रजोगुणामुळे जन्ममृत्य आणि तमोगुणामुळे अधोगती.
या गुणांमध्ये शबल आणि शुद्ध असे दोन प्रकार आहेत. शबल म्हणजे अशुद्ध. शुद्ध रजोगुण हा परमार्थाकडे नेतो तर शबल हा संसाराकडे नेतो. या त्रिगुणांचे वैशिष्ठय असे की एक गुण अन्य दोघांवर कुरघोडी करतो.

ओवी ८ ते ३४ पर्यंत शबल रजोगुणामुळे माणूस कसा वागतो हे सांगितले आहे. माझे घर,माझा संसार, माझे कुटुंब, सर्व काही माझे माझे. मीच कर्ता., सर्व काही माझ्यामुळेच होते. म्हणजे बैलगाडीखालून धावणाऱ्या कुत्र्यासारखी अवस्था माणसाची असते, मी करतो म्हणून सर्व काही होते, माझ्यामुळे अडते, मी नसीन तर पंचाईत होईल. असा मोठा गैरसमज शबल रजोगुणी माणसात असतो. छान आहार घ्यावा,मस्त कपडे घालून मिरवावे, गाडी असावी, घर खूप मोठे असावे, उत्तम सजवलेले असावे, जे बाहेर सुंदर दिसते ते माझ्या घरात असावे, स्वतः मी तरुण दिसावे ( केस काळे असावेत, नसल्यास करावेत) महागातला मोबाईल असावा, मोठा फ्लॅट टीव्ही असावा. एवढे करून सुद्धा कोणीही पाहुणे रावळे येऊच नयेत, फक्त मी आणि माझे त्रिकोणी ( आता नुसार ) कुटुंब, आईवडील शक्यतो घरात नसावेत. असे शबल रजोगुणी माणसास वाटत असते. हा माणूस करमणूक साधनांमध्ये खूपच रमतो , नाटक,सिनेमा,पार्टी, कधी दारूची पार्टी, पैसे उडवणे, जुगार, रमी अशात पैसे उडवणे हे फारच आवडते. दारू फार आवडते. आजूबाजूच्या भानगडी ऐकायला फार आवडते ज्याला आपण गॉसिप म्हणतो, त्यात फार रस असतो. वाईट माणसे आवडतात. दुसऱ्याच्या कमीपणावर बोलायला फारच आवडते. शृंगारिक वागायला आणि बोलायला फार आवडते.

सर्वात महत्वाचे यात ईश्वराला कोठेच स्थान नसते. दान, तीर्थक्षेत्री जाणे, दुसऱ्याला मदत करणे याला थारा नसतो. अशा वागण्यामुळे हवेपण संपतच नाही, हाव कमी होत नाही, इच्छा मरत नाही. मन संसारात गुंतलेले राहते. परिणामी पुनः जन्म घ्यावा लागतो. मग यातून सुटका कशी?

याचे उत्तर ओवी ३६ मध्ये श्रीसमर्थ देतात --
येक उपाये भगवतभक्ती।
जरी ठाकेना विरक्ती।
तरी येथानूशक्ती।
भजन करावे।।

हे ज्यावेळी वाटेल त्यावेळी शुद्ध रजोगुण कार्यरत झाला असे समजावे. ओवी ३७ फारच सुंदर आहे --
काया वाचा आणि मने।
पत्रे पुष्पे फळे जीवने।
ईश्वर अर्पूनिया मने।
सार्थक करावे।।

जसे जमेल, त्याप्रकारे देवाची पूजा करावी, उपासना करावी, साधना करावी. संसारातील प्रत्येक गोष्ट त्याला जोडावी, प्रत्येक प्रसंगात त्याला साक्षी ठेवावे, त्याचे अधिष्ठान पाहावे. संसारातील सुखदुःखात अडकू नये. दानपुण्य करावे. आपला संसार ईश्वराच्या आठवणीत करावा. हाच शुद्ध रजोगुण. यानुसार वागले तर आपल्यातील सत्वगुण जागा होऊन आपला प्रवास सत्वगुणाकडे होतो.

रजोगुणाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की रजोगुण वाईट नाही. आपण प्रापंचिक माणसे आहोत. आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात, कर्तव्ये असतात. ती करावीच लागतात, त्याग करून चालत नाही. हा रजोगुण नसेल तर आपण प्रपंचच करू शकणार नाही, निष्क्रिय होऊन जाऊ. त्यामुळे रजोगुण महत्वाचा आहेच पण त्याचे गुण ओळखायचे आहेत, त्यात किती गुंतायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. आपल्याला शबल हवा की शुद्ध हवा ही गोष्ट आपल्या हातात आहे. जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकायचे की त्यातून सुटायचे हा विचार प्रत्येकाने करायचा. असा हा रजोगुण.

आता तमोगुण पाहू या - दशक २-६ तमोगुण
माणूसातील शबल रजोगुण वाढतो त्यावेळी तो तमोगुणाकडे वळतो. कारण काहीही झाले तरी वाटेल त्या मार्गाने इच्छा पूर्ण करायच्या असतात.
तमोगुणाच्या खुणा ओवी २ ते ३७ मध्ये दिल्या आहेत. दुसऱ्याच ओवीत सांगतात मनासारखे झाले नाही, कोणी आपले ऐकले नाही की खूप राग येतो. मनावरचा ताबा सुटतो. मग जोरदार भांडण होते. त्यावेळी समोर कोण आहे याचे भानसुद्धा रहात नाही. नवसाबद्धल या समासात सांगितले आहे. माणूस किती प्रकारे अयोग्य वागत असतो याची भलीमोठी यादीच या समासात वाचायला मिळते.

३८ व्या ओवीत परी त्यागार्थ निरूपण। असे श्रीसमर्थ सांगतात. का त्याग करायचा याचे उत्तर ३९ व्या ओवीत देतात -
परी पतनास कारण। या गुणामुळे अधःपतन होणार आहे. मोक्षप्राप्तीचे लक्षण। नव्हे येणे।।
तमोगुणांने मोक्ष मिळणार नाही. जसे कर्म करू तसे फळ मिळणार आहे, जन्मदुःखाचे मूळ हा तमोगुणच आहे ( स्वगुण परीक्षा हा समास आपण अभ्यासाला आहे ) त्यामुळे जर जन्ममृत्युच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे असेल तर सत्वगुणच हवा.

तम म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानात देहबुद्धी प्रबळ असते. ईश्वराची जाणीव नसते.
आता तमोगुण सर्वस्वी वाईट का? उत्तर नाही. उदाहरणे पाहू -- देशाचा सैनिक देशासाठी लढतो, शत्रूला जीवे मारतो, देशाचे रक्षण करतो त्याला बक्षिस मिळते पण खून करतो त्याला फाशी मिळते. तमोगुण नसेल तर डॉक्टर रोग्याला इंजेक्शन देतो, शस्त्रक्रिया करतो. कौरवांचा वध झाला, अफझलखान मारला गेला पण बाजीप्रभूचा सन्मान झाला. रामाने रावण वध केला. कंस मारला गेला. या उदाहरणांचा विचार केला की असे लक्षात येते की या गोष्टी कर्तव्य म्हणून केल्या जातात/गेल्या, यात स्वार्थ नसतो, या ठिकाणी धर्मरक्षण आहे. याचे फळ मिळत नाही कारण ते निष्काम कर्म आहे म्हणून श्रेष्ठ आहे. मग आता सांगा तमोगुण वाईट का? माझ्या घरात चोर घुसला तर त्याला ठोकायलाच हवा, चहापाणी देत नाही. थोडक्यात तमोगुण आवश्यक आहेच. पण पण तो कुठे, कसा, कोणत्या कारणासाठी वापरला जातो हे अत्यंत महत्वाचे आहे. तो आपल्या ताब्यात हवा आपण त्याच्या ताब्यात नको.

आत सत्वगुण पाहू या - दशक २-७ सत्वगुण

ओवी ७ मध्ये सत्वगुणाची व्याख्या दिली आहे ---
जो अज्ञानाचा सेवट।
जो पुण्याचे मूळ पीठ।
जयाचेनि सापडे वाट।
परलोकाची।।

सत्वगुण जर वाढवला तर आपण नक्कीच जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर येऊ शकतो. मग यासाठी काय करायला हवे याची मोठी यादीच श्रीसमर्थ देतात व सत्वगुण कशास म्हणायचे हे ओवी ९ ते ८५ येथे विशद केले आहे. वाचताना संतमंडळी कशी असतील हे जाणवते. आपल्या आजूबाजूस अशी माणसे पहात असतो. प्रत्येक माणसात सत्वगुण असतोच असतो, चांगली गोष्टच नाही असा माणूस कोणी नाहीच. कारण प्रत्येकजण अष्टधा प्रकृती चा आहे. फक्त कोणत्या गुणांचा प्रभाव अधिक त्यावर सर्व अवलंबून असते. सामन्यातील सामान्य माणूस आपल्याला शिकवून जातो. सध्या कोरोनामुळे जग अडचणीत आहे पण त्यात सुद्धा सामाजिक दायित्व म्हणून कार्य करणारे दिसतात. ऱ्यांना कोणी ओळखत पण नसते ना त्यांची तशी अपेक्षा असते. ही सत्वगुणीच माणसे! अशा लोकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.

श्रीराम प्रत्येक मनुष्यामध्ये त्रिगुण असतातच असतात. कारण आपला देह अष्टधा प्रकृतीपासून तयार झाला आहे, म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण.

सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. त्या गुणांच्या वैशिष्ट्यानुसार मनुष्य वर्तन करतो.
सत्वगुणाचे शुद्ध आणि शबल, रजोगुणाचे शुद्ध आणि शबल असे भाग असून तमोगुणाचे असे भाग नाहीत.
शुध्द गुण परमार्थाकडे नेतो तर शबल प्रपंचाकडे नेतो. शबल म्हणजे अशुद्ध.
शुद्ध सत्वगुण असणारी माणसे खऱ्या अर्थाने माणसे असतात. शुद्ध रजोगुणी माणसे सत्वगुणी असतात पण तो झाला शबल सत्वगुण. आता दोन भाग उरतात, शबल रजोगुण आणि तमोगुण. शबल रजोगुणी माणूस सामान्य संसारी माणूस असतो. त्याच्या जीवनात परमार्थाला स्थान नसते. तो मोठ्या रसिकतेने जीवन जगतो. खावे, प्यावे, भोग भोगावे, नाटक पहावे व करावे, व्यसन करावे, संगीत नृत्यादी कार्यक्रम पहावे, पैसे मिळवावा आणि चैनीत आयुष्य घालवावे असा त्याचा दृष्टिकोन असतो. तमोगुणी माणसाचा शेवटचा वर्ग. तमोगुणी माणसात शबल रजोगुणाचे सर्व दोष असतात. एकांतिकता, आतातायीपणा आणि अघोरीपणा आढळतो.

सत्व, रज आणि तम यांना गुण हा शब्द जोडला आहे. गुण म्हणजे स्वभाव, वैशिष्ट. त्या गुणांचा परिणाम त्या त्या ठिकाणी दिसतो. तम म्हणजे अंधार. अंधार म्हटले कमी, जास्त असे नसते. अंधार म्हणजे काळाकुट्ट अंधार. अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञान हे केव्हाही हितावह नाही.

लढाई, सुई टोचणे हे कर्म आहे. गुणांची परिणीती कार्यात होते, कर्मात होते. या गुणांमुळे या गोष्टी करता येतात. कोणतेही कार्य करताना त्यामागील हेतू काय हे सर्वात महत्वाचे. जर मी कोणाला गोळी घेतली तर त्याला खून म्हणतात परंतु शत्रूला गोळी घातली की शौर्यपदक मिळते. हेतूला महत्व. म्हणजे कोणताही गुण वाईट नाही परंतु त्याचा आपण कसा वापर करतो हे महत्वाचे. मनुष्य जन्माला येतो ते हे तीन गुण बरोबर घेऊनच. श्रीराम, श्रीसमर्थ, शिवाजी महाराज अशा विभूतीकडे सुद्धा हे त्रिगुण आहेतच. म्हणजे हे गुण वापरण्याचा हेतू महत्वाचा. या विभूतींनी जे कार्य केले त्यामागील उद्देश समाज सुखी व्हावा हेच होते म्हणजे हा सत्वगुणच झाला. परंतु तमोगुणाच्या सहाय्याने उत्तम कार्य कसे करावयाचे याची जाण त्यांना होती. ठिणगी घरपण पेटवते तर सांजवत पण लागते. त्या गुणांचा वापर कसा, कुठे, किती प्रमाणात करायचा हे समजले पाहिजे. या गुणांवर आरूढ होता यायला हवे, या गुणांना आपल्यावर आरूढ होऊन द्यायचे नाही.

रात्रीचा अंधार होताना एकदम अंधार होतो का ? उजेड हळूहळू कमी होतो पण उजेड कमी झाला म्हणून अंधार पडला असे म्हणत नाही, अंधार पडू लागला असे म्हटले जाते. पण पूर्ण उजेड नाहीसा झाला की अंधार पडला असे म्हणतो. थोडासा उजेड म्हणजे शबल आणि पूर्ण प्रकाश म्हणजे शुद्ध .