आज पुढील ओव्या पाहू या. या ओव्या म्हणजे भैरवी आहे, अप्रतिम! या ओव्या दासबोध वाचून झाल्यावर म्हणजे आपण रोज एका समासाचे किंवा दोन समास वाचून झाल्यावर वाचण्याची पद्धत आहे , त्या पाठ कराव्यात. ओवी २६ ते ओवी ३७.
चला मग पाहू या ----
या वेळी ओवी ते ओवी असा अभ्यास करू या म्हणजे सोपे होईल/ वाटेल

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

जाले साधनाचे फळ।
संसार झाला सफळ।
निर्गुणब्रह्म ते निश्चळ।
अंतरी बिंबले ।। २६।।
जाले साधनाचे फळ -- दासबोध श्रवण करून झाला, चिंतन मनन करून झाले व त्यानुसार कृती केली. हे करताना संपूर्णपणे सद्गुरूंवर विश्वास टाकला, ते कधी चुकीचे सांगणारच नाहीत हा विश्वास होता, धारणा होती. मला जो मार्ग दाखवला, योग्य मार्ग दाखवला, माझा हात धरून स्वस्वरूपा पर्यंत घेऊन गेले आणि त्यांच्या मुळेच स्वस्वरूप समजले. हेच कार्य सद्गुरू करतात, सर्व काही तेच करतात.

सद्गुरूंनी सांगितलेले साधन म्हणजे साधना त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसार केली. साधन म्हणजे जिन्नस, वस्तू, स्थूल वस्तू आणि साधना म्हणजे उपासना, तपस्या. येथे साधना असा शब्द आहे . "साधनेचे" म्हणजे उपासनेचे, तपस्येचे. ही साधना मी केली, त्याचे फळ मला मिळाले. माझी तपस्या फळाला आली. ती वेळ असली, माझे स्वस्वरूप मला समजले , हाच माझा उद्देश होता. आता स्वस्वरूप उमगले म्हणून " जाले " असा शब्द आला आहे.

संसार झाला सफळ। ---- संसार म्हणजे आपण जो करतो तो नव्हे. जन्माला आल्यापासून मनुष्य जन्म सार्थकी लावण्या साठी केलेला प्रयत्न,व्याप म्हणजे संसार. तो सफल झाला, त्यात यश आले , म्हणून तो सफल झाला. मग सफल होणे म्हणजे काय?

निर्गुण ब्रह्म अंतरी बिंबले - ब्रह्म अंतरात बिबले म्हणजे नक्की काय झाले? मी कोण आहे हे समजले, ईश्वर आणि मी वेगळे नाही, एकच आहोत हे समजले. हे ब्रह्म निश्चळ आहे, एकदा अनुभूती आली की कधीही सोडून जाणारे नाही. अजून थोडे विस्ताराने पाहू.

या मागच्या ओवीत म्हणजे ओवी २५ मध्ये उन्मन असा शब्द आला आहे. मागे आपण तुर्या हा अवस्थेवर चर्चा केली. त्याच्या पुढची मनाची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत द्वैत संपते, तो आणि मी एकच होऊन जातो. वेगळेपणा उरतच नाही. आणि गंमत म्हणजे हे अद्वैत आपण शब्दात वर्णन करू शकत नाही, ते सांगण्यास परत येत नाही. या अवस्थेला विदेही स्थिती म्हणतात. उदाहरण घ्यायचे झाले तर श्रीगजानन महाराज, रामकृष्ण परमहंस.

अंतरी बिंबले।। -- ही अवस्था मनावर बिंबली, त्याचा ठसा उमटला. आता " अंतरी " म्हणजे मनावर असे का म्हटले आहे ते पाहू. मनच संकल्प विकल्प करते. तेच चंचल असते. पण ज्यावेळी ब्रह्माची अनुभूती येते त्यावेळी मनोव्यापार थांबतात. ते निश्चयात्मक होते, विकल्प थांबतात. मन खऱ्या सुखासाठी,खऱ्या आनंदासाठी धडपडत असते , हे सुख सुरुवातीस माणूस वस्तूत शोधतो, पण ते मिळत नाही, पण सद्गुरू भेटल्यावर तेच मार्ग दाखवतात, वाटचाल सुरू होते. आणि निर्गुण ब्रह्माची अनुभूती घेऊनच थांबते. पुढे अजून काही हवे असे वाटतच नाही. पूर्ण समाधान,पूर्ण शांती पूर्ण आनंद अनुभवास येतो व माणूस त्याच आनंदात राहतो, दृश्य जगताचे भान रहात नाही. असे होणे म्हणजेच संसार सफल होणे, त्याचवेळी साधनाची सांगता होते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।