पुन्हा एक सुंदर समास. श्रीसमर्थांनी देशभर ११०० पेक्षा जास्त मठांची स्थापना केली. या मठांचे जे प्रमुख होते त्यांना मठाधिपती म्हणत. प्रत्येकाला पारखुनच त्यांना मठाधिपती केले जाई. मठ का स्थापन केले? त्याचे कारण असे की त्याकाळी परकीय सत्ता होती व ती फारच जुलमी होती. सर्वत्र आस्मानी सुलतानी आली होती. जगणे कठीण होऊन गेले होते,पिके जाळली जात होती,माय बहिणींची अब्रू लुटली जात होती. सतत लढाया होत होत्या. जगावे की मरावे गे समजत नव्हते. काळ फारच कठीण होता. श्रीसमर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले व प्रत्यक्ष ही परिस्थिती पाहिली. लोकांना उभे करणे गरजेचे होते, रोजचे व्यवहार करण्यास त्यांना उद्युक्त करायचे होते, त्यांच्या अडचणी सोडवायच्या होत्या. थोडक्यात सर्व काही बिघडले होते आणि नवीन घडवायचे होते. त्यासाठी लोकांत मिसळून कार्य करणे गरजेचे होते, लोकांना धीर देणे गरजेचे होते. मग असे कार्य करण्यासाठी मध्यवर्ती केंद्र आवश्यक होते, आणि असे केंद्र म्हणजे हे मठ. त्या कार्याची जबाबदारी मठाधिपतींवर होती.
मग हे कार्य कसे होत होते? याचे उत्तर हा समास देतो.
या मठांमधून फक्त अध्यात्म सांगितले जात नव्हते तर अनेक विषयांवर चर्चा होत असत, अनेक विषय हाताळले जात. (ओवी १)
भरल्या पोटी अध्यात्म सांगणे सोपे असते असे म्हणतात. हीच गोष्ट लक्षात ठेवून समस्या सुद्धा हाताळल्या जात.
श्रीसमर्थ आपल्या विचारधारेपासून कधीच दूर गेले नाहीत. मनुष्यजन्म हा स्वस्वरूप ओळखण्यासाठीच आहे पण हे स्वस्वरूप ओळखताना संसाराचा त्याग करायचा नाही. कारण जन्माला आलेल्यास संसार हा करावाच लागतो, कर्तव्ये पार पाडावीच लागतात. पण तसे करताना कर्तव्य म्हणून करायचे आणि गुंतायचे नाही हे सूत्र. जर हे सूत्र पाळायचे आहे, संसार करता करता स्वस्वरूपाकडे वाटचाल करायची आहे तर उपासनेचा मार्ग धरायला हवा,शास्त्र काय सांगते हे समजून घ्यायला हवे,भक्तिमार्ग जाणून घ्यायला हवा, त्यावरील शंका निरसन करून घ्यायला हवे. या सर्व गोष्टी या मठांमधून होत असत. (ओवी २ ते ४) हे कार्य सर्व महंत म्हणजेच मठाधिपती करत. मठाधिपती कसे होते? ये वैराग्यशील, उदास होते. त्या भूमिकेपासून कधीच ढळले नाहीत. उपाधी (पदवी) घेत,स्वीकारत पण त्यात अडकत नसत. ज्याला जसे समजते, ज्याची जशी धारणा आहे त्यानुसार त्याला शिकवत,समजावत,शहाणे करत. थोडक्यात ते उत्तम शिक्षक होते. (ओवी ५ व ६)
या सर्वांचा परिणाम खूपच सकारात्मक होत होता. एकदा का आपल्या समस्येवर योग्य उपाय सुचवला जातो हे ज्यावेळी कळते तेथे माणूस आपोआप जातो. तसे येथे होत होते. अनेक समस्या घेऊन लोक येत होते, समस्या सोडवल्या जात होत्या,योग्य मार्ग सापडत होता.
पण हे सर्व करणारे कोण होते? ते होते श्रीसमर्थांचे महंत! कसे होते ते?कसे वागत?त्यांची काय धारणा होती? याची उत्तरे ओवी ९ ते १७ मध्ये मिळते.
यातील ओवी १४ परत परत वाचावी, पाठ करावी अशी आहे. ती आपण आजही वापरू शकतो. आपल्याला जे काही चांगले,उत्तम माहीत आहे ते दुसऱ्यांना सांगावे, त्यांचा सुद्धा फायदा करून घ्यावा,अप्पलपोटे होऊ नये. जर समजत नसेल तर समजावून सांगावे,मार्ग दाखवावा. हे सामाजिक भान ही ओवी आपल्याला देते, शिकवते.
ओवी १७ सुद्धा तशाच प्रकारे वागायला शिकवते. आपण अभ्यास करावा- दुसऱ्यांकडून करवून घ्यावा, आपण विवरण करावे तसेच दुसऱ्यांना करण्यास सांगावे. आपण भजनमार्ग अनुभवला,शांतता अनुभवली तशी दुसऱ्यास भजनमार्ग दाखवून त्याला आनंद कसा मिळेल याचा विचार करावा. ही ओवी सामाजिक भान शिकवते. मी दासबोधाचा अभ्यास करत आहे,मला फायदा होत आहे तर आपण दुसऱ्यास दासबोध वाचनास,अभ्यास करण्यास उद्युक्त करू शकतो. दासबोधाच्या अभ्यासाने निश्चित मानसिक शांतता मिळते,जगण्याचा मार्ग सापडतो, ताण कमी होतात. हे सर्व मी अनुभवले तर ते दुसऱ्यास करण्यास सांगावे. प दा अ मध्ये प्रवेश घेण्यास सांगावे. हे सामाजिक भान ही ओवी शिकवते.
एकाच ठिकाणी राहिल्यामुळे एकतर आपली किंमत कमी होते किंवा त्याजागी आपल्याला लोभ निर्माण होऊ शकतो. आपल्या उपदेशाचे कंटाळा येऊ शकतो. हे ओळखून एकाच ठिकाणी राहू नये. नवीन ठिकाणी जावे, तेथे कार्याची मुहूर्तमेढ रोववी. तेथील समाजाला कार्यरत करावे. पण हे करताना स्वतःचा अभ्यास,उपासना सोडू नये. ( ओवी १८ ते २२)
कार्य करताना प्रत्येकातील गुण ओळखून काम द्यावे. तरच यश येते. प्रत्येकाची धारणा, बुद्धी वेगळी आहे. हे ओळखून त्यानुसार काम द्यावे (ओवी २२)
हे करताना व्याप फार वाढतो. त्यावेळी मीपणा येण्याची भीती असते. अहंकार येऊ शकतो. मनाने गुंतायची शक्यता असते. म्हणून कार्य सिद्धीस गेल्यावर लगेचच तो प्रांत सोडावा,नवीन ठिकाणी जावे. कष्ट हे करावेच लागतात. सामाजिक कार्यात मेहनत आलीच. पण तसे वागल्यानेच समाज ओळखू लागतो,समाज जवळ येतो. त्यावेळी त्यांच्याकडन योग्य कार्य करवून घेता येते. परिणामी त्याच्या आयुष्याला सुंदर घाट देता येतो. पण त्यामुळे मिळणाऱ्या कौतुकात वाहून जाऊ नये, अडकू नये.
मग हे सर्व करता करता आपण लोकांना उपासनेची गोडी लावू शकतो. त्यांना हळूहळू पारमार्थिक प्रांतात घेऊन जाऊ शकतो ज्यामुळे तो माणूस संसार करेल पण कर्तव्य म्हणून. अशी भावना तो मनापासून संसार करेल त्याच्या मनात हळूहळू उदासीनता येते. संसारातील फोलपणा कळतो. कितीही केले तरी कायमचे व खरे सुख,समाधान मिळत नाही. अपूर्णत्व राहतेच. याचे कारण आपण वस्तूत सुख शोधता, दृश्य जगात सुख शोधतो, स्थूल वस्तूत आनंद शोधतो, म्हणजे जे अपूर्ण आहे त्यात आनंद,सुख,समाधान शोधतो. मग जी गोष्ट स्वतः अपूर्ण आहे ती पूर्णत्वाचा आनंद कसा देईल? मगणून संसार हा नासका आहे. तो केला तर त्यातील फोलपणा समजतो.मग संसारातील मन उडते व कर्तव्य म्हणून आपण संसार करतो. (ओवी २८) ही गोष्ट महंत समजावून सांगत पण हे सांगणे म्हणजे कृतिशील अध्यात्म होते. अनुभव घेतल्यामुळे समाजाला पटत होते. परिणामी समाज बदलू लागला.
पण हे सर्व करणारा श्रीसमर्थांचा महंत होता. हा महंत मेहनत घेत होता. त्याला त्याचे स्वस्वरूप माहीत होते व समोरच्या माणसात सुद्धा ईश्वर आहे याची जाणीव त्याला होती. यालाच म्हणतात विवेक. असा हा विवेकी महंत व त्याची ही लक्षणे म्हणून विवेकलक्षण आणि त्याचे हे निरूपण!