आपण दासबोध वाचतो, त्याचा अभ्यास करतो. पण म्हणावी तशी प्रगती होत नाही, पारमार्थिक प्रवास म्हणावा तसा वेग घेत नाही. यावर आपण खोलवर विचार करत नाही. कारण मी योग्यच वागतो,बोलतो,चालतो,व्यक्त होतो अशी आपली धारणा असते. यागोष्टीस श्रीसमर्थ छेद देतात ते या दशकापासून. हा संपूर्ण दशक म्हणजे १० समास आपल्याला विचार करायला लावतात प्रापंचिक,पारमार्थिक, व्यावहारिक सुद्धा! त्यामुळे यावर सखोल विचार व्हावा. मला बदलायचे आहे ही तीव्र इच्छा हवी, स्वीकार हवा, आत्मपरीक्षण हवे.
श्रीसमर्थ पहिला दशक संपवताना शेवटची ओवी सांगतात --
असो जे प्रापंचिक मूर्ख।
ते काये जाणती परमार्थ सुख।
त्या मूर्खाचे लक्षण काही येक।
पुढे बोलिले असे ।। १-१०-६२
आता येथे मूर्ख म्हणजे आपण समजतो तसा मूर्ख नव्हे. हा मूर्ख आहे तो प्रपंचाला सत्य मानणारा आहे, त्यात सुख शोधणारा आहे, तोच सत्य मानणारा आहे. या व्यक्तीची देहबुद्धी प्रबळ आहे, मीच कर्ता, मी सर्व काही करतो, माझ्यामुळे सर्व काही होते,सर्वांचा सांभाळ मी करतो हा ठाम विचार. वेळ मिळाला तर देव, खूपच संकट आले तर देव, काही हवे असेल तर देव आणि इतरवेळी हात सुद्धा जोडणार नाही. हा पूजा करून " टाकतो " . अत्यंत स्वार्थी,आत्मकेंद्री, अज्ञानी, चंचल बुद्धीचा, कोणतीही मर्यादा न पाळणारा, पैसा हेच सर्वस्व. या सर्व किंवा काही गोष्टी या व्यक्तीत असतात म्हणून तो मूर्ख, स्वतःचे भले करून घेणे माहीत नाही म्हणून मूर्ख ( स्वतःचं भले म्हणजे स्वस्वरूप ओळखणे ) त्यांची ही लक्षणे येथे सांगितली आहेत. पण लक्षणे नुसती ऐकण्यासाठी नाहीत तर आत्मपरिक्षणासाठी आहेत, ते करून त्याचा त्याग करायला हवा, तसा प्रयत्न हवा, प्रामाणिक प्रयत्न हवा.
हे अवगुण कोणाला सांगायची आवश्यकता नाही, स्वतःला स्वतः कसे आहोत हे बरोबर माहीत असते. त्यामुळे त्यावर विचार करून त्याग कसा करता येईल यावर चिंतन हवे. या समासाच्या तिसऱ्या ओवीत श्रीसमर्थ सांगतात "त्यागार्थ मूर्खलक्षण।बोलीजेल।। "
समासाची सुरवात गणेश आणि शारदेला वंदन आहे. गणेश बुद्धीची देवता आणि त्याच्या ठिकाणी स्फुरणरूप अशी शारदा जी आत्मज्ञानापर्यंत घेऊन जाते. ही लक्षणे कोणाची?
जे प्रापंचिक जन।
जयास नाही आत्मज्ञान।
जे केवळ अज्ञान।
त्यांची लक्षणे ।। ७ ।।
असे स्पष्ट सांगून टाकतात. जे प्रापंचिक आहेत,जे प्रपंचाला सत्य मानतात,अज्ञानी आहेत त्यांची लक्षणे आहेत. अज्ञान म्हणजे आत्मज्ञान नाही असे. ( समास व लक्षणे खूप आहेत, त्यामुळे सर्व लक्षणे घेता येणार नाहीत, ठराविक घेऊ पण अन्य कोणास कोणते विशिष्ट लक्षण हवे असल्यास तसे सांगावे , त्यावर चर्चा होईल )
श्रीसमर्थांचे वैशिष्ट्य कसे आहे हे ७३ व्या ओवीतून समजते. अवगुण स्पष्टपणे सांगितले तर कोणाला आवडत नाही, राग येतो याची जाणीव त्यांना आहे. पण शस्त्रक्रिया केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही पर्याय नाही अशी अवस्था झाल्यामुळे जरा कडक भाषेत श्रीसमर्थ सांगतात व दिलगिरी व्यक्त करतात. त्यांचे हे वैशिष्ट्य आहे.
पढतमूर्ख लक्षण:
पढत मूर्ख म्हणजे कोण याचे उत्तर श्रीसमर्थ पहिल्याच ओवीत देतात -- आता ऐका शहाणे।असोनि मूर्ख।। योग्य काय अयोग्य काय याची जाणीव आहे तरी सुद्धा चुकीचे वागतो तो पढत मूर्ख.
ज्ञान काय अज्ञान काय, सार काय असार काय, देहबुद्धी काय आत्मज्ञान काय याची पूर्ण कल्पना असली तरी अयोग्य वागत रहातो, विचार करतो,अयोग्य वर्तन करतो तो पढत मूर्ख. ओवी १५ - हत्ती शक्तीवान प्राणी आहे. जंगलात कोळ्यांचे जाळे असते व ते ऊन पडल्यामुळे चमकते. जर तेथून हत्ती जात असेल तर तो तेथे थबकतो, त्याला वाटते मी जाऊ शकणार नाही. त्यामुळे अडकतो. खरे तर येथून पुढे जाणे हत्तीला शक्य असते पण भ्रम झाल्यामुळे तो अडकतो. दुसरे उदाहरण भुंग्याचे. कमळातला मध प्राशन करत असताना भुंगा वेळेचे भान ठेवत नाही. सूर्यास्तानंतर कमळ मिटते व भुंगा अडकतो. तसे प्रापंचिक माणसाचे असते. तो इतका प्रपंचात गुंतलेला असतो की कशाचे भान रहात नाही. त्यातच रमतो, किती अडकावे याचे भान त्याला रहात नाही. संसाराला सत्य मानतो. अशाश्वतला शाश्वत मानतो. म्हणून तो पढत मूर्ख.
ओवी ३५ - अर्थासाठी लावी परमार्थ - पैसे मिळवण्यासाठी परमार्थाचा वापर करू नये
परत ओवी ३९ मध्ये सांगतातच की त्यागार्थ लक्षणे सांगितली आहेत.
४० व्या ओवीत स्पष्टपणे सांगतात - परममूर्खामाजी मूर्ख। जो संसारी मानी सुख।
आपण नक्की काय करतो? विचार करावा