पत्रद्वारा दासबोध अभ्यास
“दासबोध म्हणजे साक्षात समर्थ रामदासच.”
घरा-घरातून श्री समर्थांचे भव्य-दिव्य विचार पोचवावे, समाजात समर्थांची विचारधारा रुजवावी, परत एकदा शिवराज्य-रामराज्य यावे — अशी समाजप्रबोधनाची आस मनी धरून कै. स.भ. द्वा. वा. केळकर तथा अप्पा व गीताताई केळकर यांनी “पत्रद्वारा दासबोध अभ्यास” हा उपक्रम सुरू केला.
अभ्यासक्रमातील समासांच्या नियमित वाचन, चिंतन, मननामुळे आणि समीक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विचारांना दिशा मिळते. सातत्यामुळे विचारातून आचार परिवर्तन होते. व्यक्तिमत्त्व विकास होतो.
कितीतरी उपक्रम येतात व जातात, नंतर त्यांची आठवणही नसते. पण पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम निरंतर राहिला व सातत्याने वाढला. साधारण १ लाख लोकांनी आजपावेतो हा अभ्यास केला आणि आजही दरवर्षी हजारो विद्यार्थी ग्रंथराज दासबोधाचा अभ्यास करत आहेत.
अप्पा नेहमी म्हणत, “अनर्थकारी अर्थापासून हा उपक्रम दूर आहे.”येथे कुणालाही मानधन नाही, पगार नाही. सर्व समीक्षक “सेवा” म्हणून काम करतात!
श्रीसमर्थांची शिकवण त्रिकालाबाधित आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर त्याबाहेर भारतात व परदेशातही हा अभ्यास पोचला आहे. आता इंटरनेटवरून तरुण पिढीदेखील हा अभ्यास करते आहे. या उपक्रमाला तरुण नेतृत्वही लाभले आहे, ते नवनव्या कल्पना राबवत आहेत — ही मोठी जमेची बाजू आहे.
तीन वर्षांचा अभ्यासक्रम
36 swadhyays across three progressive years
दासबोधात अध्यायाऐवजी “समास” हा शब्द वापरलेला आहे. दहा समासांच्या संचाला “दशक” म्हणतात. असे वीस दशक म्हणजे २०० समास आहेत. अभ्यासक्रमाची रचना माहीत असलेल्या विषयातून क्रमाक्रमाने नवीन संकल्पनांकडे जाणारी अशी केली आहे.
दासबोध प्रवेश
पहिले वर्ष — निवडक १२ समास
दासबोधाच्या मूलभूत विचारांचा परिचय
दासबोध परिचय
दुसरे वर्ष — निवडक २६ समास
विचारांचा विस्तार व सखोल अभ्यास
दासबोध प्रबोध
तिसरे वर्ष — ३५ समास
संपूर्ण ग्रंथाचे सार आणि प्रबोधन
दर वर्षाच्या शेवटी प्रशस्तीपत्र दिले जाते. अभ्यास प्रश्नोत्तररूपी आहे — त्या त्या महिन्यातील समासाचे महिनाभर वाचन-मनन अपेक्षित आहे (या वाचनाला सुमारे दहा मिनिटे पुरतात).
अभ्यासक्रम कसा चालतो?
नोंदणी
ऑनलाइन पोर्टल, ई-मेल किंवा पत्रद्वारे प्रवेश-नोंदणी करून अभ्यासार्थी म्हणून सहभागी व्हा.
स्वाध्याय
दासबोधाचे दशक क्रमाने वाचून दरमहा दिलेल्या स्वाध्यायाची प्रश्नोत्तरे लिहा.
समीक्षण
अनुभवी समीक्षक आपला स्वाध्याय तपासून सस्नेह मार्गदर्शन करतात — सर्व सेवाभावी.
दासबोध प्रवीण
तीन वर्षांत ३६ स्वाध्यायांचे अध्ययन पूर्ण करून “दासबोध प्रवीण” व्हा.
अभ्यासक्रमाचे शुल्क
प्रवेश, परिचय आणि प्रबोध असा हा तीन वर्षांचा, ३६ स्वाध्यायांचा अभ्यासक्रम असून तीनही वर्षांचे एकत्रित शुल्क रू. ५००/- इतके आहे.
पहिला स्वाध्याय स्वीकारार्ह असल्यास अभ्यासक्रमाचे शुल्क भरून आपला अभ्यासार्थी क्रमांक व समीक्षक क्रमांक निश्चित करावा. आपल्या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी लागणारा ग्रंथ आणि साधनसामग्री (स्वाध्याय-साधन) आपल्या पत्त्यावर पाठवली जाईल. हे स्वाध्याय साधन आपल्या तीनही वर्षांच्या अभ्यासासाठी लागणार आहे; त्यांचे मूल्य अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
शुल्क भरल्यावर श्री सज्जनगडावरून श्री समर्थांचा प्रसाद आणि स्वाध्याय साधन संकल्पपत्रावर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवण्यात येईल. पैसे भरल्यानंतर ३० दिवसांत स्वाध्याय साधन न आल्यास ८६६९४ ०५९७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
महत्त्वाचा खुलासा:उपक्रम शुल्कात समाविष्ट असलेले स्वाध्याय साधन हे केवळ अभ्यासार्थीसाठी आहे, त्यामुळे पहिला स्वाध्याय केंद्राकडे पोचल्यावरच ‘स्वाध्याय साधन’ आपल्याकडे रवाना होईल. स्वाध्याय न आल्यास भरलेले शुल्क ‘उपक्रमास देणगी’ म्हणून समर्थकार्यासाठी अर्पण होईल. कोणत्याही परिस्थितीत उपक्रम शुल्काचा परतावा मिळणार नाही.
अभ्यासात कसे सहभागी व्हावे?
अ) पत्रद्वारे अभ्यास
पहिला स्वाध्याय फुलस्केपवर लिहून, पूर्ण माहिती असलेले संकल्पपत्र (स्वतःची साक्षरी करून) आपण ज्या विभागात राहतो त्या विभाग केंद्र संचालकांकडे पोस्टाच्या पाकिटातून पाठवावे. सोबत स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा.
उत्तरासाठी स्वतःचा पत्ता लिहिलेले पोस्टाचे पाकीट पाठवावे. त्यातून आपणास पहिल्या स्वाध्यायाचे समीक्षण, पुढील अभ्यासासंबंधी सूचना, व समीक्षकांचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक पाठवला जाईल.
दरमहा एक स्वाध्याय फुलस्केपवर लिहून समीक्षकांकडे उत्तराच्या पोस्टेजसह पाठवायचा असतो.
आ) ई-मेलद्वारे अभ्यास
पहिला स्वाध्याय (PDF फॉरमॅटमध्ये) dasbodh.abhyas@gmail.com या ई-मेल आयडीवर ई-केंद्रसंचालकांना पाठवावा. हस्तलिखित स्कॅन करून किंवा Microsoft Word मध्ये टाइप करून पाठवता येते.
मेलमध्ये स्वाध्याय साधन पावती क्रमांक नमूद करावा. आपणास पुढील अभ्यासासंबंधी सूचना, समीक्षकांचे नाव, ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक पाठवला जाईल.
आता ऑनलाइन पोर्टलद्वारेही (app.dasbodhabhyas.org) अभ्यासार्थी नोंदणी करतात, स्वाध्याय सादर करतात व समीक्षकांचे मार्गदर्शन घेतात.
दासबोधाच्या अभ्यासाची निकड
आपण समाधानी आहात काय? आपल्या प्रयत्नांना दरवेळी यश येतेच का? आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे हे आपणास माहीत आहे काय? थोडे आत्मपरीक्षण केल्यास या सर्व प्रश्नांचे उत्तर “नाही” असेच आढळते. अस्थिरता, अनिश्चितता, असमाधान आणि भीती — अशीच सध्याची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि ते कसे करता येईल? याचा सर्वांगीण विचार आणि शिकवण दासबोधात आहे.
व्यक्तिगत विकास
स्वावलंबनाची सवय लागून परिस्थितीवर नियंत्रण करण्याची क्षमता वाढते.
सहकार्याची भावना
परस्परावलंबित्वाची योग्य जाण निर्माण होऊन इतरांच्या सहकार्याने परिस्थितीवर मात करण्याची दिशा मिळते.
तत्त्वज्ञानाची दृष्टी
योग्य तत्त्वज्ञानाची स्पष्ट दृष्टी मिळून नियंत्रणाच्या पलीकडे असलेल्या परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता येते.
अभ्यासातून काय साध्य होईल?
अभ्यासात सातत्य असल्याने विचारातून परिवर्तन होऊन दासबोधाचे अंतरंग उलगडत जाते. आध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होतात, नरदेहाचे महत्त्व व सार्थक कशात आहे हे कळते. प्रपंच परमार्थस्वरूप होतो. जीवनाविषयी नवीन दृष्टी लाभून आत्मचिंतनाची सवय लागते. “आत्मिक विकासाबरोबर समाजाचा विकास” ही विचारधारा दृढ होऊ लागते.
नवचैतन्य
रोजच्या जीवनात नैराश्यप्रसंगी मानसिक आधार देऊन नवचैतन्य निर्माण होते.
मार्गदर्शन
अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक ठरतात; मनातले संभ्रम दूर होतात.
आत्मविश्वास
योग्य व्यवहार आचरणात आणण्याचे बळ मिळते, आत्मविश्वास वाढतो.
“साधेच पण निश्चित गुणकारी असेच हे औषध आहे”— अनेक अभ्यासार्थींचा अनुभव
आपल्यात परिवर्तन घडवून आणण्याची सुवर्णसंधी
नोंदणी करा आणि समीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथराज दासबोधाचे अध्ययन करा.
